Lok Sabha 2024: शिरुरची जनता तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही; अमोल कोल्हेंचे अजित पवारांना सडेतोड उत्तर

Lok Sabha 2024: शिरुरची जनता तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही; अमोल कोल्हेंचे अजित पवारांना सडेतोड उत्तर

उरुळी कांचन (पुणे) – शिरुर लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्यांवरुन गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांसोबत जाण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील कामे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अडवली असल्याचा आरोप केला आहे. डॉ. कोल्हे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील आहेत. डॉ. कोल्हे यांनी शिरुर मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत संपर्क ठेवून प्रचाराला सुरुवात केली आहे. उरळी कांचन येथील जाहीर सभेत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला, ते म्हणाले की, तुमच्या सांगण्यावरुन भूमिका बदलली नाही, स्वाभिमान गहाण टाकला नाही, म्हणून निधी अडवला असले तर शिरुरची जनता तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – महाविकास आघडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सुनावलं.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन उरुळी कांचन येथे  करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अशोक पवार, जिल्ह्याध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, काँग्रेसचे देविदास भन्साळी यावेळी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. बारामती आणि शिरुरमध्ये मोदींच्या विरोधात बोलणारे खासदार होते म्हणून निधी मिळाला नाही, या अजित पवारांच्या विधानाचा खरपूस समाचार डॉ. कोल्हे यांनी घेतला.

पराभव दिसायला लागल्यावर मोठ्या पदावरचा माणूस कसा गडबडतो

अमोल कोल्हे म्हणाले की, पराभव समोर दिसायला लागल्यावर इतक्या मोठ्या पदावरचा माणूस कसा गडबडतो, याचे वैषम्य वाटते. हेच गावागावात जाऊन विचारत आहेत, तुमच्या गावात खासदाराने निधी दिला का? पण आज त्यांनीच उत्तर दिलं, की विरोधी पक्षातले खासदार होते म्हणून निधी दिला नाही. त्यामुळे नम्रतापूर्वक इतक्या मोठ्या राष्ट्रीय अध्यक्षांना विचारू इच्छितो, असा टोला लगावत कोल्हे म्हणाले, उठता बसता ज्या फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव घेता, त्या फुल्यांनी कधी म्हटलं होता का, विरोध करता म्हणून तुमच्या मुलीला शाळेत शिकवणार नाही? स्वतःला हाच प्रश्न विचारा विरोधी विचाराचे खासदार आहेत, म्हणून निधी दिला जात नसेल तर याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री देत असतील तर फुले-शाहू- आंबेडकर यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला उरतो का? असा सवालही केला.

हेही वाचा : Lok Sabha 2024: …तर पुन्हा लोकसभा लढवणार नाही; ऐन प्रचारात अजित पवार असं का म्हणाले?

अजित पवारांना लिहिलेली पत्रे झळकावत डॉ. कोल्हे म्हणाले की, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना निधी मिळावा म्हणून सातत्याने पत्र लिहिली. ही पत्र त्या लोकांसाठी लिहिली होती, जी अजितदादा आल्यानंतर बेंबीच्या देठापासून एकच वादा म्हटल्यावर ओरडत होती, त्यांच्यासाठी लिहिली होती. माझ्या घरची काम नव्हती. मी केवळ भूमिका बदलली नाही, तुमच्या सांगण्यावरून स्वाभिमान गहाण टाकला नाही, म्हणून शिरुर मतदार संघातील जनतेची कामे अडवली असतील, तर हीच जनता तुम्हाला याचे उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा अमोल कोल्हेंनी दिला.

फेसबुकच स्टेटस्ट ठेवलं तरी फोन येतात, बघून घेतो, राज्यातल्या सरकारचं किती बारीक लक्ष आहे कार्यकर्त्यांवर. पण, लक्ष्यात ठेवा तुम्ही भूमिका बदलली तेव्हाच तुम्ही सगळे अधिकार गमावलेत. गरीब असलो तरी झुकणार नाही, माझा स्वाभिमान विकणार नाही, या शब्दात कोल्हेंनी ठणकावून सांगितलं.

प्रचारासाठी वेळ, पण छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (29 एप्रिल) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर अमोल कोल्हे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारासाठी पुण्यात येता येते, पण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी गेल्या दहा वर्षात एकदाही येता आले नाही. हे महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता कधीही विसरणार नाही.

बापावर जायचं नसत

काही महिन्यांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांनी काय केलं, याबाबत केलेल्या विधानाचाही डॉ. कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतला. प्रत्येक घरात एक बाप राबत असतो, त्याने काय केलं हा प्रश्न जोपर्यंत विचारला जात नाही, तोपर्यत त्याचे महत्व कळत नाही. एकच उत्तर देता, आमच्या जिरायती जमिनी बागायती या बापाने केल्यात. आम्ही जे कळकटलेले कपडे घालून फिरतो होतो, तेच आज स्टार्चचे कपडे घालून फिरतोय ते आज या बापाने आखलेल्या धोरणांमुळे फिरतोय. आमची संस्कृती आहे, काहीही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसत. ज्यांना प्रश्न पडला असेल, अमोल कोल्हे लढायला कसा तयार झाला, तर त्याचे उत्तर एकच सांगतो, बापाच्या मांडीवर जाऊन बसल्यावर पैलवान असू किंवा काटकुळ पोरगा असू देत, ते बी लढायला तयार होते, म्हणून बापावर जायचं नसतं, असे म्हणत शहांना सुनावले.

हेही वाचा : Lok Sabha 2024: कितीही रडीचे डाव खेळा, आमचीच राष्ट्रवादी जनतेतून दणकून येणार; कोल्हेंनी दादांना डिवचले

First Published on: April 29, 2024 1:17 PM
Exit mobile version