प्रताप सरनाईकांची ईडीला विनंती क्वारंटाईन असल्यामुळे पुढील आठवड्यात चौकशी करा!

प्रताप सरनाईकांची ईडीला विनंती क्वारंटाईन असल्यामुळे पुढील आठवड्यात चौकशी करा!

कोविड-१९ च्या नियमानुसार, परदेशात जाऊन आल्यामुळे मी क्वारंटाईन आहे. तसेच माझा मुलगा विहंग सरनाईक यांची पत्नी आजारी असून ती इस्पितळात असल्यामुळे विहंग सरनाईक यांना तेथे राहावे लागत आहे. त्यामुळे चौकशीसाठी ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) कार्यालयात मी अथवा माझी मुले उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे आमची चौकशी पुढील आठवड्यात करण्यात यावी, अशी विनंती शिवसेनेचे आमदार, प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी बुधवारी ईडीला केली आहे.

ईडीने मंगळवारी प्रताप सरनाईक यांची कार्यालये आणि घरावर धाडी टाकल्या. तसेच प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन त्यांची सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. ईडीने धाड टाकली तेव्हा प्रताप सरनाईक परदेशात असल्यामुळे ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे ईडीने समन्स बजावून प्रताप सरनाईक यांना बुधवारी चौकशीसाठी आपल्या कार्यालयात बोलावले होते. आपण क्वारंटाईन असल्यामुळे पुढील आठवड्यात आपली चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र प्रताप सरनाईक यांनी ईडीला पाठवले. सरनाईक यांच्या एका नातेवाईकाने हे पत्र स्वत: ईडीच्या कार्यालयात जाऊन दिल्याचे समजते.

सरनाईक यांचा आक्रमक पवित्रा
ईडीच्या चौकशीनंतरही प्रताप सरनाईक यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. ईडीने धाड टाकली म्हणून तोंड बंद करणार नाही. फाशी दिली तरी ती स्वीकारण्यास तयार असल्याचे सरनाईक यांनी म्हटले होते. ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना रानौत यांच्यावर हक्कभंग दाखल केला, अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्याची मागणी लावून धरली, त्याच दिवशी उद्या काय होणार याचा विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केले. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी असल्याचे सरनाईक म्हणाले.

First Published on: November 26, 2020 7:17 AM
Exit mobile version