उरण पोस्ट ऑफिस आता जेएनपीटी टाऊनशिपमध्ये

उरण पोस्ट ऑफिस आता जेएनपीटी टाऊनशिपमध्ये

उरण पोस्ट ऑफिस आता जेएनपीटी टाऊनशिपमध्ये

गेल्या अनेक वर्षांपासून शहरात कोट नाका येथे असलेले पोस्ट ऑफिस जेएनपीटी टाऊनशिपमध्ये स्थलांतरित करण्यात आल्यामुळे नागरिकांसह शासकीय कार्यालयांची मोठी गैरसोय झाली आहे. एखादे शासकीय टपाल पोस्टाने पाठवायचे झाल्यास ६ किलोमीटर अंतरावर जावे लागत असल्यामुळे वेळ आणि पैसा वाया जात असून, हे कार्यालय पुन्हा शहरात आणण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.पोस्ट ऑफिस असलेली इमारत जुनी असल्याने तिची दुरवस्था झाली आहे. नगर परिषदेने ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केली होती. इमारत कधीही पडण्याचा धोका आणि वर्दळ असल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पनवेल टपाल विभागाच्या आदेशाने इमारतीमधील पोस्ट ऑफिस तात्पुरत्या स्वरुपात जेएनपीटी टाऊनशिप येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

मात्र पोस्ट ऑफिस थेट जेएनपीटी येथे हलविण्यात आल्याने नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. पोस्ट ऑफिसमध्ये जा-ये करण्यासाठी रिक्षाला प्रत्येकी ३० रुपये मोजावे लागतात. शिवाय वेळेचाही अपव्यय होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना पोस्ट ऑफिसमध्ये मंथली इंटरेस्ट स्कीम, सिनिअर सिटिझन स्कीम, सेविंग खाते यासाठी अनेकवेळा जावे लागते. शहरातील पोस्ट ऑफिसमुळे ते सोयिस्कर होते. जेएनपीटीच्या प्रवेशद्वारापर्यंत रिक्षाने गेल्यानंतर पुन्हा चालत जावे लागते. याचा ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.पोस्ट ऑफिसमध्ये इंटरनेट आणि लाईट नसेल तर दुसर्‍यांदा जावे लागते. या सर्व गैरसोयींचा विचार करून पोस्ट ऑफिस पुन्हा शहरात सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी विमला तलाव मॉर्निंग कट्ट्याच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

कोट नाका येथील पीओ बेकरीची इमारत मोडकळीस आल्याने नगर परिषदेने धोकादायक इमारत जाहीर केल्याने तात्पुरत्या काळासाठी जेएनपीटी टाऊनशिप येथे पोस्ट ऑफिसचे स्थलांतर केले आहे. मात्र ते किती दिवसासाठी, हे मात्र सांगता येणार नाही, अशी माहिती उरण पोस्ट ऑफीसमधील सब पोस्ट मास्तर रश्मी म्हात्रे यांनी दिली.


हेही वाचा – आयुष्यात उंदीर मारला नाही, ते कोथळा काय बाहेर काढणार? – राणे


 

First Published on: August 25, 2021 6:45 PM
Exit mobile version