युपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार?

युपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार?

शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार सध्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पुण्यातील विमानतळासंदर्भात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही पाच विरोधी पक्षनेत्यांसह भेट घेतली. तत्पूर्वीच दिल्ली दरबारी जाताच, युपीएतील विविध पक्षांच्या नेत्यांना शरद पवार भेटले. या भेटीनंतर शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. शनिवारी शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यावेळी, यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, शरद पवार यांनी त्याचा इन्कार करताना सदर वृत्तात काहीही तथ्य नाही, असा खुलासा केला आहे.

शरद पवार यांची यूपीएच्या अध्यक्षपदी निवडीची शक्यता आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या जागी शरद पवारांची वर्णी लागणार असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे, केंद्रीय राजकारणातही शरद पवारांकडे नेतृत्व देत भाजपाला आव्हान उभारण्याचा प्रयत्न युपीएतील घटक पक्षांचा आहे. त्यासाठी, राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.भाजपविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत आहे. देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा आहे.

शरद पवार ही निवड स्वीकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रात विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे. सध्या देशातील विविध राज्यांत भाजपाचे वाढलेले वर्चस्व आणि युपीएची कमी आक्रमकता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचीही निवड रखडली आहे. सध्या सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे आणि युपीएचे नेतृत्व आहे. मात्र, युपीएच्या चेअरमनपदी शरद पवार यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

या फक्त वावड्या
जाणूनबुजून अशा गोष्टी पेरल्या जात आहेत. शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून या वावड्या उठवण्यात आल्या आहेत. परंतु, वास्तवाशी या बातमीचा काहीच संबंध नाही. या बातमीत काहीच तथ्य नाही. पवारांना यूपीएचे चेअरमन करण्याचा विषय सोडा, त्याबाबत कोणती चर्चाही झालेली नाही. खुद्द पवारांनाही अशा प्रकारची चर्चा सुरू असल्याचे माहीत नसेल.
-तारिक अन्वर, ज्येष्ठ नेते, काँग्रेस.

First Published on: December 11, 2020 7:23 AM
Exit mobile version