ठाणे सिव्हिल हॉस्पिटल होणार सुपर स्पेशालिटी ; बेड्सची संख्या ९०० वर

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल होणार सुपर स्पेशालिटी ; बेड्सची संख्या ९०० वर

ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन जिल्हावासियांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांची सुविधा असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय मिळावे, यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेरीस यश आले आहे. जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने विशेष बाब म्हणून मंजुरी दिली असून त्यामुळे या रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार आहे. तसेच, न्यूरॉलॉजी, आँकॉलॉजी व आँको सर्जरी सेक्शन, कार्डिओलॉजी व कार्डिओ व्हॅस्क्युलर सेक्शन आणि नेफ्रॉलॉजी व डायलिसिस सेक्शन यांसारख्या अत्याधुनिक उपचार सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार असल्यामुळे कर्करोग, हृदरोग, मेंदूशी संबंधित आजार, श्वसनाशी संबंधित विकार आदी आजारांवरही उपचार करता येणे शक्य होणार आहे.

ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाची सध्याची क्षमता ३०० खाटांची आहे. ठाणे व लगतच्या पालघर जिल्ह्यातील लाखो गोरगरीब रुग्ण या रुग्णालयावर अवलंबून आहेत. परंतु, या दोन्ही जिल्ह्यांची वाढती लोकसंख्या आणि आरोग्याच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या रुग्णालयावर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. तसेच, अनेक आधुनिक उपचार येथे उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रस्ते अपघातात तातडीने उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांवर येथे उपचार करता येणे शक्य नसल्यामुळे त्यांना मुंबईला पाठवावे लागते. तातडीने उपचार न मिळाल्यामुळे अनेकदा असे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन या जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय व्हावे, यासाठी राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, ठाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार हे ही याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होते. याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने २२ सप्टेंबर रोजी जारी केला.

सुपरस्पेशालिटी वैद्यकीय उपचार सुविधा 

शिवसेना-भाजप युती सरकारमधील माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या स्तरावर बैठका घेण्यात आल्या. शिंदे यांच्याकडेही काही काळ आरोग्य मंत्रीपदाचा कार्यभार असताना या प्रस्तावाला गती देण्यात आली. ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील रुग्णांची गरज लक्षात घेऊन या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची क्षमता आणि स्वरूप निश्चित करण्यात आले. त्यानुसार सध्याच्या ३०० खाटांच्या जागी तिप्पट क्षमतेचे, म्हणजे ९०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय करण्यात येणार आहे. यात सर्वसाधारण रुग्णालय ५०० खाटांचे, महिला व बाल रुग्णालय २०० खाटांचे आणि सुपरस्पेशालिटी सुविधा असलेले रुग्णालय २०० खाटांचे असणार आहे.

गोरगरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात न्यूरॉलॉजी (५० खाटा), आँकॉलॉजी व आँको सर्जरी सेक्शन (५० खाटा), कार्डिओलॉजी व कार्डिओ व्हॅस्क्युलर सेक्शन (७० खाटा) आणि नेफ्रॉलॉजी व डायलिसिस सेक्शन (३० खाटा) या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. या सुपरस्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असून अत्याधुनिक वैद्यकीय उपचार त्यांना उपलब्ध होणार आहेत, असे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विशेषतः रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी मुंबईला पाठवण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे तातडीने उपचार मिळून त्यांचे प्राण वाचतील, असेही शिंदे म्हणाले. ठाणेकरांच्या बऱ्याच वर्षांच्या मागणीला न्याय दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले.


हे ही वाचा – OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा, सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची सही


 

First Published on: September 23, 2021 7:02 PM
Exit mobile version