दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजणार

दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजणार

नारायण राणेंची नवी भविष्यवाणी

महाराष्ट्रात दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजतील असे भाकित खासदार नारायण राणे यांनी केले आहे. लवकरच महाराष्ट्रात सरकारचे फटाके वाजतील. यांना काहीच जमत नाही त्यामुळे ती वेळ लवकरच येईल. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत फटाके वाजणार. तो काढायला गेले तर फार वेळ लागेल, त्यामुळे वेळ आल्यावर तोदेखील समोर आणू, असे नारायण राणे यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

नारायण राणे यांनी यावेळी फटाके फोडण्यावर राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधावरुनही टीका केली. दिवाळीला फटाकेबंदी करण्याच्या मताचा मी नाही. सण साजरे करण्यात तुम्ही व्यत्यय आणता. सगळीच लहान मुले, मोठे लोक फटाके वाजवून आनंद लुटतात. तोदेखील तुम्ही घेऊ देत नाही. फक्त हात धुवा, अंतर ठेवा, घरात बसा एवढंच सांगतात. सर्वांनी दिवाळी साजरी केली पाहिजे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्रीपदाला शोभणारे एकही काम केलेले नाही. पिंजर्‍यातून हात धुवा आणि अंतर ठेवा याच्यापलीकडे मुख्यमंत्र्यांना काही सांगता येत नाही. राज्याचा त्यांना अभ्यास नाही. ठाकरे कुटुंबियांचे बरेच जमीन व्यवहार आहेत. बाळासाहेब असेपर्यंत ठाकरे कुटुंबाची शिवसैनिकांसोबत पार्टनरशिप नव्हती. मातोश्रीवर देवाण घेवाण करुन व्यवहार होतात. आमदार, खासदारांना काही स्थान नाही, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

शिवसेना शब्द पाळते असे मला वाटत नाही. भाजपासोबत युती असताना दिलेले शब्द कुठे पाळले, गद्दारी का केली मग? भाजपा केवढा मोठा पक्ष आणि शिवसेना कुठे. बिहारमध्ये शिवसेनेची काय दैना झाली..एकाचे तरी डिपॉझिट वाचवू शकले का? भाजपासोबत शिवसेनेने कोणतीही बरोबरी करु नये. महाराष्ट्र सोडून कुठेही त्यांची चांगली स्थिती नाही. महाराष्ट्रात ५६ आले त्यासाठी भाजपाच कारणीभूत आहे. बिहारमध्ये उमेदवार उभे केले, ५० जणांचे डिपॉझिट जप्त झाले याची लाज वाटली पाहिजे. शिवसेनेने टीका करणे आता बंद करावे, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे.

नुसते जळत राहणे, बोटे मोडत राहणे याशिवाय शिवसेनेने काही केलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचे काय अस्तित्व आहे. आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. विकासकामे ठप्प आहेत. शेतकर्‍यांना पैसे मिळू शकत नाहीयेत. मदत जाहीर केली पण दिली नाही. जिल्ह्याला मिळणारे विकासाचे पैसे जात नाही आहेत. सिंधुदुर्गाची वाईट अवस्था आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

नारायण राणे यांनी बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशाचे श्रेय नरेंद्र मोदींचे असल्याचे सांगितले. बिहार निवडणुकीत आणि भारतात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत्या त्या सर्व ठिकाणी भाजपाला यश मिळाले आहे, हे यशाचे मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी जे काम केलं त्याबद्दल जनतेने त्यांना हे श्रेय मिळवून दिले. मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मेहनतीचे ते फळ आणि यश आहे, असे मला वाटते असे ते म्हणाले आहेत.

नितीश कुमार तीनवेळा मुख्यमंत्री झाले आहेत. ते विश्वासू आणि कर्तबगार आहेत. त्यांच्यावर विश्वास टाकला आहे हे चुकीचे म्हणणार नाही. योग्य व्यक्तीला मुख्यमंत्री पदावर बसवले आहे, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.

First Published on: November 13, 2020 7:05 AM
Exit mobile version