कंत्राटदारांचा काळाबाजार! कोरोना रुग्णसंख्या ११० ते ३१०, पण जेवणावळ दररोज ८०० माणसांची!

कंत्राटदारांचा काळाबाजार! कोरोना रुग्णसंख्या ११० ते ३१०, पण जेवणावळ दररोज ८०० माणसांची!

कोरोनाच्या आपत्तीत इष्टापत्ती साधत काही विशिष्ट कंत्राटदारांनी महापालिकेकडून मोठे बिल उकळण्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात केवळ ११० ते ३१० रुग्णसंख्या असताना दररोज ८०० माणसांच्या जेवणावळीचे तब्बल ३३ लाख ६५ हजारांचे बिल काढण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकाराला भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

कोरोनाच्या काळात शहरातील विविध भागात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून क्वारंटाईन केंद्रे उभारण्यास सुरुवात झाली होती. या केंद्रात दाखल झालेले रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना चहा, नास्ता, दोन्ही वेळचे जेवण पुरविण्यासाठी २८० रुपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आले होते. ठाणे महापालिका हद्दीत १५ एप्रिल रोजी रुग्णांची संख्या ११० होती. तर ३० एप्रिल रोजी रुग्णसंख्या ३१० पर्यंत पोहोचली होती. मात्र, १५ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात क्वारंटाईन केंद्रातील रुग्ण, वैद्यकिय आणि महापालिकेतील कर्मचारी आदींना सुमारे ८०० जणांना जेवण दिल्याचे बिल आकारण्यात आले आहे. या बिलापोटी महापालिकेकडून ३३ लाख ६५ हजारांचे बिल मंजूर करण्यात आले. नुकत्याच झालेल्या महासभेत या बिलावर शिक्कामोर्तबही करण्यात आले.

एप्रिल महिन्यामध्ये शहरात संसर्ग झालेले अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यासाठी ठाणे महापालिकेने चार खासगी रुग्णालयांना मंजुरीही दिली होती. तर काही रुग्ण व रुग्णांच्या कुटुंबियांना भाईंदरपाडा, कासारवडवली आणि मुंब्रा येथील क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, दररोज ८०० जणांना जेवण देण्याएवढी रुग्णसंख्या निश्चित नव्हती, याकडे भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.

शहरातील क्वारंटाईन केंद्रात दररोज कोणाला जेवण दिले गेले. त्यातील रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांची यादी प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी महापालिकेकडे केली आहे.

सर्व काही ग्लोबल, हा अनोखा योगायोग!

महापालिकेच्या क्वारंटाईन केंद्रात जेवण पुरविण्याचे कंत्राट ग्लोबल ट्रेडिंग कंपनीला मिळाले होते. यापूर्वी क्वारंटाईन केंद्रातील रुग्णांच्या अंथरुण-पांघरुण धुलाईचे कंत्राटही ग्लोबल लॉंड्रीला मिळाले. ग्लोबल हबमध्ये उभारलेले विशेष रुग्णालयही ग्लोबल नावानेच आहे. सर्व काही ग्लोबल असल्याचा हा अनोखा योगायोग आहे, असा टोला भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मारला आहे.

First Published on: October 27, 2020 11:38 PM
Exit mobile version