कल्याण कसारा मार्गावरील गाड्या सुरू, लांब पल्ल्याच्या प्रवाशांना दिलासा

कल्याण कसारा मार्गावरील गाड्या सुरू, लांब पल्ल्याच्या प्रवाशांना दिलासा

राज्यात सुरु असलेल्या पावसाच्या हाहा:कारामुळे कल्याण कसारा इगतपुरी रेल्वे मार्ग बंद झाला होता. मात्र तब्बल १६ तासांनी कल्याण कसारा इगतपुरी मार्ग पुन्हा सुरु झाला असून लांब पल्ल्यांच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Trains on Kalyan-Kasara route start)  या रेल्वे मार्गादरम्यान दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा फटका बसला होता. मात्र आता हा मार्ग सुरू झाल्याने मुंबईहून लांब पल्ल्याला जाणाऱ्या प्रवशांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बुधवारी रात्री उशिरा कल्याण कसारा इगतपुरी मार्गावर दरड कोसळली. पुराचे पाणी संपूर्ण रेल्वे रुळावर आले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. एकूण परिस्थिती लक्षात घेता या मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले तर काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या होत्या. या सर्व परिस्थितीचा लांब पल्ल्याला जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र १६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर कल्याण कसारा इगतपुरी मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरुळीत करण्यात आलीय.

कोकण रेल्वे सेवा अद्याप ठप्प

कोकणात पावसाने रौद्र रुप धारण केले आहे. त्यामुळे कोकण रेल्वे अद्याप ठप्पच आहे. कोकणात जाणाऱ्या मार्गांवर पाणी साचल्याने अद्याप कोकण रेल्वे सुरु होण्याची शक्यता नाहीये. परंतु पश्चिम आणि मध्य रेल्वे वाहतूक सुरुळीतपणे सुरु आहे. दोन्ही मार्गावरील रेल्वे काही काळ उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे बऱ्यापैकी सुरू आहे. मात्र कोकण रेल्वे सुरु होण्यास २४ तासांपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा – कोकणातील स्थिती भीषण, संकटात असलेल्यांना तात्काळ मदत करण्याची फडणवीस यांची मागणी

First Published on: July 22, 2021 5:20 PM
Exit mobile version