टीआरपी चोरांच्या मुसक्या आवळणार

टीआरपी चोरांच्या मुसक्या आवळणार

टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणार्‍या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आल्यानंतर फेक टीआरपीच्या चौकशीची जबाबदारी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्याचा निर्णय घेतल्याने टीआरपी चोरांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता वाढली आहे.

आयुक्त परमबीर सिंह यांनी खास बाब म्हणून ही चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. विभागाचे उपायुक्त पराग मणेर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची तपासणी होणार आहे. खोटा टीआरपी दाखवून काही चॅनेल्सनी आर्थिक फायदा मिळवल्याचा संशय आहे, यात आर्थिक फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे, असेही पोलिसांनी सांगितले आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्ह्याशी संबंधित असल्याने त्याची कसून चौकशी करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत.

टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणार्‍या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला. बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचार्‍यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होते. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. याप्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या चालकांना अटक करण्यात आली आहे.

तर रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठीही रॅकेट चालवणार्‍यांकडून मदत घेण्यात आल्याची माहितीही समोर आल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. त्यामुळे आता रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तकांची चौकशी करण्यात येईल. दुसरीकडे सत्यमेव जयते! ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स टीव्ही’च्या चालकांप्रमाणेच लोकांना पैसे देऊन बनावट टीआरपी वाढवणार्‍या ‘रिपब्लिक’ चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

First Published on: October 11, 2020 6:41 AM
Exit mobile version