केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी रायगड दौरा

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी रायगड दौरा

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी रायगड दौरा

ठाणे जिल्ह्यातून पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपदात सामील होण्याचा बहूमान खासदार कपिल पाटील यांना मिळाला आहे. देशाचा कारभार लोकाभिमुख असावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून १६ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत ठाणे आणि अलिबाग जिल्ह्यात झंझावाती जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा दिनांक १७ रोजी मंगळवारी रायगड जिल्हा दौरा आयोजित आहे.

रायगड जिल्ह्यातील जनआशीर्वाद यात्रेला १७ ऑगस्ट रोजी अलिबाग येथून सुरुवात होणार आहे. यामध्ये सर्वप्रथम ते सकाळी ८.३० वाजता अलिबाग कोविड रुग्णालयाला भेट देणार आहेत. त्यानंतर अलिबाग विश्रामगृह येथे सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद आणि सकाळी १० वाजता लाभार्थी व मच्छिमारांची भेट, त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन, भाग्यलक्ष्मी हॉल येथे प्रकल्पग्रस्तांचा मेळावा, चरी येथे आंदोलनातील व्यक्ती व त्यांच्या परिवाराचा सत्कार सोहळा, आणि त्यानंतर ते पेणकडे प्रयाण करणार आहेत. दुपारी १२.४५ वाजता पेण येथे आमदार रवीशेठ पाटील यांच्या निवासस्थानी मूर्तिकारांची भेट, त्यानंतर पनवेलकडे रवाना होणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते यांनी सांगितले.

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकर्‍यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तिकारांबरोबर बैठक, भूमिपुत्रांशी संवाद, त्याचबरोबर आंदोलनातील व्यक्ती व परिवाराचा सत्कार करणार आहेत. या यात्रेत भाजपचे ज्येष्ठ नेते, जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील नेते, तसेच लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असणार आहे. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेची जय्यत तयारी सुरू असून, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यात्रेच्या नियोजनाबाबत विविध बैठका सुरू असून, पद्धतशीरपणे नियोजन केले जात आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त समाजघटकांना जोडून घेत नागरिक व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.


हेही वाचा – मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी कोरोना पॉझिटिव्ह, सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू


 

First Published on: August 16, 2021 12:53 PM
Exit mobile version