वट सावित्री कथा २०२२- सावित्रीने यमराजाकडून चातुर्याने मिळवले होते पतीचे प्राण

वट सावित्री कथा २०२२- सावित्रीने यमराजाकडून चातुर्याने मिळवले होते पतीचे प्राण

आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी महिला अनेक उपवास,व्रत वैकल्ये करतात. पण या सर्व व्रतांमध्ये वट सावित्रीचे व्रत (Vat Savitri Vrat) म्हणजे वटपौर्णिमा हे सर्वोच्च असून करवा चौथप्रमाणेच फलदायी आहे. यावर्षी वट सावित्री १४ जून २०२२ रोजी आहे. सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. यामुळे हे व्रत केल्याने पतीवर येणारी सर्व संकट दूर होतात त्याला दिर्घायुष्य लाभते अशी या व्रतामागची आख्यायिका आहे. यामुळे या व्रतामागची कथा जाणून घेणेही गरजेचे आहे.

मद्र देशाचा राजा अश्वपति हा निपुत्रिक होता. पुत्रप्राप्तीसाठी त्याने अनेक वर्ष खडतर तपस्या केली. त्याच्या तपस्येवर प्रसन्न होत माता सावित्रीने त्याला कन्येचे वरदान दिले. या कन्येचा जन्म हा देवी सावित्रीच्या वरदहस्तामुळे झाला असल्याने राजाने तिचे नाव सावित्री ठेवले. सावित्री मोठ्या लाडाकोडात वाढत होती ती सगळ्यांची लाडकी होती. राजकुमारी सावित्री वयात आल्यानंतर राजाने तिच्यासाठी योग्य वर शोधण्यास सुरुवात केली. मात्र सावित्रीला अपेक्षित वर मिळत नव्हता. यामुळे राजाने शेवटी वरसंशोधनासाठी सावित्रीला एका मंत्र्याबरोबर तपोवनात पाठवले.

त्यानंतर सावित्रीने राजा द्युमत्सेनचा पुत्र सत्यवान याला वर म्हणून निवडले. राजा द्युमत्सेन यांच्याकडे कुठलेच राज्य राहीले नव्हते. ते रानावणात राहत. वर सत्यवानाची निवड केल्यावर सावित्री राजमहालात परतली. त्यावेळी नारदाने एक भविष्यवाणी केली. या भविष्यवाणीनुसार सत्यवानाला १२ वर्षानंतर मृत्यूयोग होता. हे ऐकताच राजा अश्वपति याने सावित्रीला दुसरा वर निवडायचा आदेश दिला. मात्र सावित्रीने त्यास नकार देत सत्यवान हाच माझा आयुष्यसोबती असल्याचे सांगितले. त्यानंतर सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह पार पडला. सावित्री आपल्या सासरी गेली. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसे सत्यवानाच्या मृत्यूघटीका समीप येऊ लागली. त्यामुळे सावित्रीने पतीच्या दिर्घायुष्यासाठी उपवास सुरू केले. एके दिवशी सावित्री जंगलात लाकडे आणायला गेली असता सत्यवानाचा मृत्यू झाला. यमराज त्याचे प्राण घेऊन जाऊ लागला. हे बघताच सावित्री यमराजाच्या मागे जाऊ लागली. यामुळे यमराज तिच्यावर नाराज झाला .त्यांनी तिला परत जाण्यास सांगितले. पण सावित्रीने माघारी जाण्यास नकार दिला. तिची निष्ठा बघून यमराज प्रसन्न झाला आणि त्यांनी तिला तीन वर मागावयास सांगितले.

सावित्रीने मागितले तीन वरदान

त्यावर सावित्रीने दृष्टीहीन झालेल्या सासू सासऱ्यांची दृष्टी, गमावलेले वैभव आणि शंभर पुत्रांचे वरदान मला द्यावे अशी विनंती यमराजाला केली. यमराजाने तिला तथास्तु म्हणत आशिर्वाद दिले. त्यानंतर यमराज पुन्हा जाऊ लागले. पम तरीही सावित्री त्यांच्या मागे जाऊ लागली. यावर यमराज नाराज झाले. पण सावित्रीने त्यांना सांगितले की तुम्ही मला
१०० पुत्रांच वरदान दिले आहे आणि माझ्या पतीचे प्राण घेऊन जात आहात. पतीशिवाय हे वरदान मला लाभणार नाही. सावित्रीचे हे चातुर्य बघून यमराज खुश झाला. त्याने तात्काळ सत्यवानाचे प्राण मुक्त केले. सावित्रीने सत्यवानाचे शरीर वटवृक्षाखाली ठेवले. त्यानंतर सत्यवान पुन्हा जिवंत झाले. सावित्री सत्यवानाला घेऊन घरी आली तेव्हा तिच्या सासू सासऱ्यांना दृष्टी आली होती. तसेच तिचे गेलेले वैभवही तिला परत मिळाले होते. ते बघून सावित्रीने यमराजाला श्रद्धेने नमन केले.

 

First Published on: June 8, 2022 5:16 PM
Exit mobile version