PM Modi on Sharad Pawar : कद्दावर नेता म्हणत मोदींचा पवारांवर निशाणा; 10 वर्षातील कामाची माढ्यात केली उजळणी

PM Modi on Sharad Pawar : कद्दावर नेता म्हणत मोदींचा पवारांवर निशाणा; 10 वर्षातील कामाची माढ्यात केली उजळणी

माळशिरस येथील सभेत मोदींचा पवारांवर निशाणा

माळशिरस – ‘महाराष्ट्र के कद्दावर नेता’ असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर निशाणा साधला. मनमोहनसिंग सरकारच्या काळात महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते देशाचे कृषिमंत्री होते. त्यांच्या काळात शेतकऱ्याची एफआरपी, सहकारी साखर कारखान्यांचे इन्कम टॅक्सचे प्रश्न रखडलेल असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पंतप्रधानांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला.

आज (मंगळवार) नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात तीन सभा आहेत. त्यातील पहिली सभा ही माढा मतदारसंघासाठी माळशिरस येथे झाली. त्यानंतर मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव येथे त्यांच्या सभा आहेत. सोमवारी पुण्यातील रेसकोर्सवर झालेल्या सभेतही मोदींनी शरद पवारांवर टीका करताना त्यांना अतृप्त आत्मा म्हटले.

हेही वाचा : Narendra Modi Rally in Pune : एका भटकत्या आत्म्यामुळे महाराष्ट्र अस्थिर, मोदींची घणाघाती टीका

महाराष्ट्राचे सहकार क्षेत्रात मोठे काम

महाराष्ट्र ही सहकाराची भूमी राहिलेली आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले की, येथील सहकाराचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. सहकारातून निर्माण झालेले साखर कारखाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे राहिले. आमचे सरकार हे सहकाराचे क्षेत्र आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आमच्या सरकारला दुसऱ्यांदा बहुमत मिळाल्यांतर आम्ही 2019 मध्ये सहकार मंत्रालय स्थापन केले.
आमच्या सरकारने आतापर्यंत आठ हजार किसान संघ स्थापन केले. हे किसान संघ ऑनलाईन विक्रीपासून एक्सपोर्टपर्यंत काम करत आहेत. येत्या पाच वर्षांत दोन लाख किसान संघ स्थापन करण्याचे आमचे ध्येय असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

कांदा उत्पादकांसाठी मोदींची मोठी घोषणा

माळशिरसच्या सभेत पंतप्रधान मोदींनी कांदा, बटाटा आणि ऊस उत्पादकांबद्दल भाजपच्या संकल्पपत्रात काय म्हटले आहे, त्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, येत्या पाच वर्षांत देशात विशेष स्टोरेज क्लस्टर बनवले जाणार आहेत. याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते दिल्लीत बसून राहिले; मोदींचा पवारांवर निशाणा

मी कोणावरही टीका करण्यासाठी येथे आलेलो नाही, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, जेव्हा देशात मनमोहनसिंगांचे सरकार होते तेव्हा महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते देशाचे कृषिमंत्री होते. त्यांच्या काळात ऊसाचा एफआरपी अवघे 200 रुपये होता. मोदी सराकरच्या काळात आज सरासरी 350 रुपये करण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऐरियर्ससाठी साखर आयुक्तांकडे फेऱ्या मारव्या लागत होत्या. आता ती स्थिती राहिलेली नाही. आमच्या सरकारच्या काळात शतप्रतिशत परतावा दिला जात आहे.
2014 मध्ये ऊसाचे एरियर्स 57 हजार कोटी दिला जात होता. यावर्षी 1 लाख 14 हजार कोटींचे पेमेंट आमच्या सरकारने केले आहे. यातील 32 हजार कोटी रुपये हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाल्याचे मोदी म्हणाले.

साखर कारखाने हे इन्कम टॅक्समुळे 90च्या दशकापासून त्रस्त होते आणि हे ज्येष्ठ नेते दिल्लीत बसलेले होते. तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. मी त्यांना पत्र पाठवत होतो, भेटून सांगत होतो, वेळोवेळी समजावत होतो की तुमच्याकडेही सहकारी साखर कारखाने आहेत. मात्र या ज्येष्ठ नेत्यांनी सहकारी साखर कारखान्यांचे प्रश्न सोडवले नाही, असा आरोप पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता केला.

हेही वाचा : PM Modi in Maharashtra: काँग्रेसने 60 वर्षांत केले नाही ते मोदी सरकारने 10 वर्षांत करुन दाखवले; मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका

सहकारी साखर कराखान्यांना 10 हजार कोटींचे कर्ज

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा आमचे सरकार स्थापन झाले तेव्हा आम्ही हा प्रश्न सोडवला. सहकारी साखर कारखान्यांना दहा हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले. याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला.
जेव्हा येथील ज्येष्ठ नेते केंद्रात मंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांकडील पिकांची फक्त साडे सात लाख कोटींची खरेदी केली होती. आम्ही गेल्या दहा वर्षांत 20 लाख कोटींची खरेदी करुन दाखवली आहे, असा टोला शरद पवारांचे नाव न घेता लगावला.

माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस-महाविकास आघाडीच्यावतीने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात शरद पवार यांनी त्यांच्या सर्व विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मोदींच्या आरोपांना आता शरद पवार कसे आणि काय उत्तर देतात हे पाहाणे औत्सूक्याचे ठरणार आहे.

Edited by – Unmesh Khandale

First Published on: April 30, 2024 1:37 PM
Exit mobile version