हुश्श्य, Corona गाशा गुंडाळत असल्याची चिन्ह; WHO नं सादर केली आकडेवारी!

हुश्श्य, Corona गाशा गुंडाळत असल्याची चिन्ह; WHO नं सादर केली आकडेवारी!

भारतात गेल्या ५ महिन्यांपासून आणि जगभरात गेल्या ९ महिन्यांपासून म्हणजे जवळपास गेल्या डिसेंबर महिन्यापासून थैमान घातलेल्या Corona नं आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं त्यासंदर्भातली काही आकडेवारी सादर केली असून या आकडेवारीनुसार दक्षिण-पूर्व आशिया आणि अरेबियन देशांचा काही भाग वगळता इतर भागामध्ये गेल्या आठवड्याभरात नवे कोरोना रुग्ण आणि कोरोना रुग्णांचे मृत्यू यांचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलं आहे. त्यामुळे गेल्या ९ महिन्यांच्या काळात पहिल्यांदाच कोरोनानं आपले हातपाय आवरल्याचं या भागात दिसून आल्याचं स्पष्ट झालं आहे. WHO नं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीवरून हे निष्कर्ष निघत असले, तरी अजूनही जगातले सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक कोरोना मृत्यू, या बाबतीत अमेरिका पहिल्याच स्थानावर आहे, तर नव्याने सापडणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत भारत पुढे आहे.

काय सांगतेय आकडेवारी?

सोमवारी रात्री जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, जगभरात आत्तापर्यंत २ कोटी ३ लाख ६५ हजार रुग्ण कोरोनाबाधित असून ८ लाख ११ हजार ८९५ रुग्ण कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. मात्र, असं असलं, तरी सोमवारी रात्री आलेल्या आकडेवारीत गेल्या आठवड्याभरात १७ लाख रुग्ण नव्याने वाढले असून ३९ हजार रुग्ण दगावले असल्याचं समोर आलं आहे. त्याच्या गेल्या आठवड्यापेक्षा हे नव्या रुग्णांचं प्रमाण ४ टक्क्यांनी तर मृतांचं प्रमाण तब्बल १२ टक्क्यांनी घटल्याचं यावरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे गेला आठवडा हा जगभरात इतर आठवड्यांपेक्षा दिलासादायक चित्र निर्माण करणारा ठरला आहे.

दक्षिण-पूर्व आशियात मात्र परिस्थिती कायम!

दरम्यान, जगभरातली आकडेवारी दिलासादायकरित्या घटली असली, तरी दक्षिण-पूर्व आशियाचा विचार करता परिस्थिती फारशी बदललेली नाही. या भागात तब्बल २८ टक्के रुग्ण वाढले असून १५ टक्क्यांनी मृत्यू वाढले आहेत. नेपाळमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अरेबियन देशांमध्ये देखील कोरोना रुग्णांची आकडेवारी ४ टक्क्यांनी वाढली आहे. या भागात मृतांचा आकडा मात्र लक्षणीयरीत्या खाली आला आहे.

आफ्रिका खंडाचा विचार केला, तर नवे रुग्ण आणि नव्याने होणारे मृत्यू यामध्ये अनुक्रमे ८ टक्के आणि ११ टक्क्यांची घट झाली आहे. विशेषत: अल्जेरिया, केनिया, घाना, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये. युरोपात मात्र गेल्या ३ आठवड्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सगळ्या जगालाच सध्या कोरोनाची लस (Corona Vaccine) लवकरात लवकर बाजारात येण्याची प्रतीक्षा लागली आहे.

First Published on: August 25, 2020 5:39 PM
Exit mobile version