…तर रस्त्यावरून फिरणे मुश्कील होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना इशारा

…तर रस्त्यावरून फिरणे मुश्कील होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना इशारा

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी हे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर, देशाचा अभिमान आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही अवमान केला. त्यांनी एकप्रकारे ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. अजूनही त्यांचा सूर तसाच आहे. त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, हे असेच चालू राहिले तर, त्यांना रस्त्यावरून फिरणे मुश्कील होईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांना दिला.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज, शनिवारी अखेरच्या दिवशी विधानसभेत भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी मरणयातना भोगल्या आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसल्या आहेत. उठसूठ सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनी देखील एक दिवस अंदमानातील सेल्युलर तुरुंगात राहून यावे. त्यांना फक्त एक तास घाण्याला जुंपले तर त्यांना सावरकरांनी भोगलेल्या यातना कळतील. म्हणून याचा निषेध करावा तितका कमी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीबद्दल गुजराच्या सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यावरून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याचे काल, शुक्रवारी जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, राहुल गांधी यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात, मी माफी मागायला सावरकर नाही, असे ते म्हणाले. याच संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्ही सावरकरांना काय समजता? असा सवाल करत, राहुल गांधी यांना याची शिक्षा मिळालीच पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

First Published on: March 25, 2023 5:45 PM
Exit mobile version