मारुती सुझुकीतून ३००० कंत्राटी कामगारांची कपात!

मारुती सुझुकीतून ३००० कंत्राटी कामगारांची कपात!

प्रातिनिधिक छायाचित्र

देशाची आर्थिक स्थिती डबघाईला गेली असून मोठ्या प्रमाणत आर्थिक मंदी पसरली आहे. त्यामुळे अनेक उद्योग बंद पडले असून हजारो नोकर्‍या जात आहे. आता भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीला देखील आर्थिक मंदीचा झळा बसला आहे. मारुती सुझुकीने ३००० कंत्राटी कामगारांची कपात केली असल्याची माहिती आज मंगळवारी २७ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत देण्यात आली.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी आज मंगळवारी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांशी बोलताना याबाबत माहिती दिली. देशाच्या नव्या वाहन प्रदुषण नियमावलीनुसार मारुती सुझुकी सध्या वाहन निर्मितीवर भर देत आहे. त्यासाठी कंपनीने सीएनजी आणि हायब्रीड कार्सच्या उत्पादनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. सीएनजीवर चालणार्‍या वाहनांचे उत्पादन या वर्षात ५० टक्क्यांनी वाढवण्याचे नियोजन सध्या कंपनीकडून सुरु असल्याचेही यावळी भार्गव यांनी सांगितले. दरम्यान, जुलै महिन्यांत सलग नवव्या महिन्यांत वाहनांच्या विक्रीत घट नोंदवली गेली आहे. अधिकाधिक मोटार वाहन उत्पादक आपल्या कंपन्यांमध्ये कामगार कपात करीत आहेत. तसेच खर्च कमी करण्यासाठी तात्पुरते उत्पादन थांबवण्यात येत असल्याचे रॉयटर्सच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

First Published on: August 28, 2019 1:06 AM
Exit mobile version