रेल्वेपेक्षा विमान प्रवास स्वस्त

रेल्वेपेक्षा विमान प्रवास स्वस्त

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेच्या प्रथमश्रेणी दरापेक्षा विमानाचे तिकिट परवडते, ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. दिल्ली ते चेन्नई हे रेल्वेचे अंतर 2175 किमी असून हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस अथवा गरीब रथसारखी रेल्वे हे अंतर कापायला 30 पेक्षा जास्त तास घेते. दुसरीकडे, याच अंतरासाठी विमानाला सरासरी तीन तास लागतात. रेल्वेचे प्रथम श्रेणीचे दिल्ली-चेन्नईचे तिकिट पाच हजार रुपयांच्या आसपास आहे, तर विमानाचे तिकिट साडेतीन ते चार हजार रुपये इतके पडते. अशा स्थितीत, वेळ आणि पैसा दोन्हीही वाचवण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर विमानसेवेचा विचार करु लागल्याने, लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या तिकिटाबाबत फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, असा ठपका कॅगने ठेवला आहे.

या वस्तुस्थितीचा दृष्य परिणाम म्हणजे खुद्द रेल्वेचेच अधिकारी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे ऐवजी विमानप्रवासाची निवड करत आहेत आणि रेल्वेनीही त्यांना तशी परवानगी दिली आहे, हे विशेष. सर्वसामान्य नागरिकही याच तत्त्वाने लांबच्या प्रवासाला रेल्वेपेक्षा विमानाला पसंती देत असल्याने देशांतर्गत विमान वाहतुकीला मोठी चालना मिळाली आहे. त्यातून रोजगार निर्मितीही होत असल्याचे निरिक्षण भारताचा सनदी लेखापालांनी नोंदवले आहे. कॉम्प्ट्रोलर ऍण्ड ऑडिटर जनरल अर्थात ’कॅग’च्या ताज्या अहवालात याविषयी भाष्य करण्यात आले असून लांब पल्ल्याच्या किमान 141 रेल्वे मार्गांवरील ट्रेन्समध्ये वातानुकुलीत अथवा प्रथम श्रेणीच्या जास्त सीट्स ठेवण्यापेक्षा द्वितीय श्रेणीच्या जास्त सीट्स ठेवण्याविषयी सुतोवाच करण्यात आले आहे. लोकसभेच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनातही ’कॅग’च्या निष्कर्षांवर विचार करण्याचे रेल्वे मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.

First Published on: August 7, 2019 1:12 AM
Exit mobile version