अब्जाधीशांच्या टॉप-10 यादीत अंबानींनी गौतम अदानीला टाकले मागे

अब्जाधीशांच्या टॉप-10 यादीत अंबानींनी गौतम अदानीला टाकले मागे

काही दिवसांपूर्वी गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीनंतर आता ते जगातील श्रीमंत लोकांच्या टॉप-10 मधील यादीत थेट दहाव्या क्रमांकावर घसरले आहेत. शेअर्समध्ये घसरण होण्याआधी गौतम अदानी हे चौथ्या क्रमांकावर होते. परंतु आत ते उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापेक्षा एक स्थान खाली घसरले गेले आहेत. मुकेश अंबानी हे सध्या श्रीमंत लोकांच्या यादीत नवव्या स्थानावर आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या घोषणेदरम्यान अदानी हे जगातील श्रीमंतांच्या यादीत 10 व्या स्थानावर घसरले आहेत. तसेच त्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने गौतम अदानी यांची एकूण संपत्ती (गौतम अदानी नेट वर्थ) $83.9 अब्ज इतकी खाली आली आहे. फोर्ब्सच्या यादीत गौतम अदानी हे 10 व्या स्थानावर आहेत तर उद्योगपती मुकेश अंबानी हे नवव्या स्थानावर आहेत.

गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर अदानी हे एका दिवसांत सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्या श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे. 20.8 अब्ज डॉलर्सच्या एका दिवसाच्या घसरणीनंतर, अदानी एलोन मस्क, जेफ बेझोस आणि मार्क झुकरबर्ग यांच्या पंक्तीत सहभागी झाले आहेत. इलॉन मस्क याने एका दिवसात सर्वाधिक $35 बिलियन, मार्क झुकरबर्ग $31 बिलियन आणि जेफ बेझोस $20.5 बिलियन इतकी संपत्ती गमावली होती.

जगातील इतर श्रीमंत लोकांच्या यादीत सध्या बर्नार्ड अर्नाल्ट हे 214 अरब डॉलर इतक्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. तसेच त्यानंतर एलन मस्क हे 178.3 अरब डॉलर इतक्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर जेफ बेजोस हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीनंतर एकाच दिवशी त्यांच्या संपत्तीमध्ये देखील मोठी घसरण झाली.

गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका देखील करण्यात आली होती. अमेरिकी रिसर्च फर्म हिंडनबर्ग नामक संस्थेने 24 जानेवारी 2023 ला एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यामध्ये त्यांनी अदानी ग्रुपविरोधात अनेक प्रश्न देखील उपस्थित केले होते. ज्याचा परिणाम अदानी समूहाच्या शेअर्सवर झालेला पाहायला मिळाला. त्यानंतर काही वेळातच अदानींच्या शेअर्समध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली.

First Published on: February 1, 2023 6:30 PM
Exit mobile version