महागाईने गाठला 8 वर्षातील उच्चांक, एप्रिलमध्ये किरकोळ महागाई 7.79 टक्क्यांवर

महागाईने गाठला 8 वर्षातील उच्चांक, एप्रिलमध्ये किरकोळ महागाई 7.79 टक्क्यांवर

एप्रिलमध्ये महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना झटका बसला आहे. खाद्यपदार्थांपासून तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईने 8 वर्षातील उच्चांक गाठला आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक  आधारित किरकोळ महागाई एप्रिलमध्ये 7.79 टक्के वाढली आहे. मे 2014 मध्ये किरकोळ महागाई दर 8.32 टक्के होता. महागाई दर उच्चांकी पातळीवर पोचल्याने रिझव्‍‌र्ह बँकेकडून आगामी पतधोरणात व्याजदरात वाढ होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

किरकोळ महागाईचा हा आकडा सलग चौथ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा अधिक आहे. सरकारने रिझर्व्ह बँकेला महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे उद्दिष्ट दिले आहे. जानेवारी 2022 पासून किरकोळ महागाई दर 6 टक्क्यांच्या वर राहिला आहे.  एप्रिलमध्ये खाद्यपदार्थातील महागाई दर दर 8.38 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर मागील महिन्यात 7.68 टक्के होता आणि वर्षभरापूर्वी याच महिन्यात 1.96 टक्के होता.

रिझव्‍‌र्ह बँकेने नुकतेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण बैठकीनंतर पहिल्या तिमाहीत 6.3 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 5 टक्के, तिसर्‍यामध्ये 5.4 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.1 टक्के महागाई राहण्याचा अंदाज वर्तवला होता.  महागाईच्या चिंतेमुळे आरबीआयने व्याजदरात 0.40 टक्के वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेतला.  बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आगामी काळातही महागाई कायम राहण्याची शक्यता आहे.

शहरांपेक्षा खेड्यांमध्ये महागाईचा दर जास्त आहे. आकडेवारीनुसार, मार्चमध्ये ग्रामीण भागातील महागाई 7.66 टक्के होती. एप्रिल 2021 मधील 3.75 टक्क्यांच्याच्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये खेड्यांमध्ये महागाई 8.38 टक्क्यांपर्यत वाढली. तर मार्चमध्ये शहरांमधील महागाईचा दर ६.१२ टक्के होता. एप्रिल 2021 मधील 4.71 टक्क्यांच्या तुलनेत  एप्रिल 2022 मध्ये 7.09 टक्के महागाई वाढली आहे.

किरकोळ महागाईचा दर कसा ठरवला जातो?
कच्चे तेल, वस्तूंच्या किमती, उत्पादन खर्च याशिवाय इतर अनेक गोष्टी आहेत ज्या किरकोळ महागाईचा दर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सुमारे 299 वस्तूंच्या किमतीच्या आधारावर किरकोळ महागाईचा दर ठरवला जातो.

First Published on: May 12, 2022 9:05 PM
Exit mobile version