ऑनलाइन शॉपिंगचा धूमधडाका, ई-कॉमर्स कंपन्यांचा प्रभाव दिवाळीवर

ऑनलाइन शॉपिंगचा धूमधडाका, ई-कॉमर्स कंपन्यांचा प्रभाव दिवाळीवर

e commerce

– मुक्ता लोंढे
मुंबई : दिवाळी सेलिब्रेशन आयुष्यात तीन टप्प्यांत वेगळ्या स्वरुपात आपण साजरा करतो. शाळेत असताना दिवाळीची 21 दिवस सुट्टी, कॉलेजला असताना 5 दिवस आणि नोकरीला असताना दिवाळीची सुट्टी आणि तीही फक्त एक दिवस. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हा मीम व्हायरल झाला होता. यावरून अशी बाब लक्षात येते की, कितीही इच्छा असली तरी कामाच्या बिझी शेड्यूलमुळे आई-वडील कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. परिणामी, याचा प्रभावही आपसुकच तरुणाईवर पडत आहे. यामुळे ही मुले देखील स्वत:ला सोशल मीडियावर गुंतवून ठेवू लागली आहेत. ऑनलाइन गेम्स, वेबसीरिज, चॅटींग अॅपसह ऑनलाइन खरेदीची क्रेझही प्रंचड वाढत आहे.

पूर्वी दिवाळीची सुट्टी लागली की, संपूर्ण सुट्टीचे शेड्यूल मुले, आई – वडील आधीच फिक्स करून ठेवायचे. अमूक-अमूक दिवशी साफ-सफाई करायची, फराळ बनवायचा, खरेदी करायची, फिरायला जायचे… मात्र आता यापैकी काहीच घडताना दिसत नाही. “मला वेळ नाही, तू एकटी जाऊ शॉपिंग कर किंवा ऑनलाइन ऑर्डर कर” अशा सूचना अनेकजण फोनवरून देताना दिसतात. फराळही रेडिमेड घेण्याकडे कल वाढत आहे. आता तर त्यासाठी बाजारातही जावे लागत नाही. ऑनलाइन ऑर्डर दिली की, फराळ घरपोच! ई-कॉमर्स कंपन्यांचा दबदबा वाढत चालला आहे.

लोकांच्या व्यग्र दिवसाचा ई-कॉमर्स कंपन्यांनी फायदा घेत डिस्काऊंट, शॉपिंग सेल, बंपर ऑफर अशा मथळ्याखाली प्रलोभन देण्यास सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर याचा धडाका सुरू आहे. नेहमी आपण म्हणतोच सोशल मीडियाचा वापर जितका चांगला तितकाच वाईट. याचप्रमाणे शॉपिंगवर अमाप खर्च होऊ लागला आहे. दिवाळीत लागणाऱ्या उटण्यापासून ते फराळापर्यंत सर्व वस्तू अगदी एका क्लिवर ग्राहकांना सहज उपलब्ध होत असल्याने लोकांना याचा फायदा देखील होऊ लागला आहे.

यापूर्वी आई-वडीलांजवळ हट्ट करणे, दुकानात जाऊन खरेदी करणे, फटाके, गिफ्टस अशी रेलचेल असायची. मात्र हे दृश्य आता दुर्मीळ झाले आहे. आता जर एखाद्या दुकानात आपण खरेदी करायला गेलो आणि “आणखी काय नवीन आलंय?” असं दुकानदाराला विचारले तर तो देखील उत्तर देतो की, “आमचं सोशल मीडिया अकांऊट फॉलो करा. तुम्हाला त्यावर सर्व डिटेल्स मिळतील. तुम्ही ऑनलाइन ऑर्डर देखील करू शकता.” ऑनलाइन खरेदीची टक्केवारी वाढत असल्याने मार्केटमध्ये जाऊन गर्दी आणि गोंधळात खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या एका क्लिवर हवी ती वस्तू मिळते, असा विचार बहुतांश लोक करतात.

ऑनलाइनवर कोणत्या वस्तूंना सर्वाधिक मागणी?
मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून यंदा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी सर्वाधिक जास्त होत आहे. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, एसी, फ्रीजच्या खरेदीसह कॅमेरा, मोबाईल पॉवर बॅँक, कपडे, फूटवेअर्स आणि अॅक्सेसरिजलाही चांगली मागणी आहे. मात्र या बदलामुळे लोकांच्या मानसिकतेवरही काही प्रमाणात परिणाम होऊ लागला आहे. सोशल मीडियावर फॉलर्सची संख्या वाढवण्यासाठी धडपडणारे प्रत्यक्ष आयुष्यात गर्दी टाळू लागले आहेत. एकटे राहण्याची सवय लोकांमध्ये रुजू होऊ लागली.

भारतीय संस्कृतीत अनेक सण-उत्सवांना विशेष असे महत्त्व आहे. दिवाळी, दसरा, पाडवा या सणांनिमित्त लोकं एकत्र जमून शुभेच्छा देतात. पण आता कामाच्या धबडग्यात हा प्रकारही कमी होत चालला आहे. आजकाल सोशल मीडियावर शुभेच्छांचे फोटो पोस्ट करणे तसेच काही तासांपुरत्या मर्यादित असणाऱ्या सोशल मीडियावरील स्टोरीमध्ये मेंशन करण्यापुरते हे सण मर्यादित राहिले आहेत का?, असा सवाल या निमिताने उपस्थित होतो.


हेही वाचाः दिवाळी शिध्याचे वितरण ऑनलाइनच होणार; मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती

First Published on: October 24, 2022 4:00 AM
Exit mobile version