शेअर गुंतवणूकदारांनी कमावले ५ लाख कोटी

शेअर गुंतवणूकदारांनी कमावले ५ लाख कोटी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपन्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा करताच शेअर बाजारात तेजी आली.अर्थमंत्र्यांनी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. या घोषणे पाठोपाठ मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स २ हजार २00 अंकांनी वधारला तर निफ्टीत देखील ६५० अंकांची वाढ झाली. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीत तब्बल ५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

शुक्रवारी सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा मंदीचे वातावरण होते. पण अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात तेजी आली. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नव्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 22 टक्के करण्यात आला आहे. या घोषणेनंतर बँक निफ्टी, मिडकॅप, स्मॉलकॅप इंडेक्समधील शेअरमध्ये तेजी आली.

त्यानंतर दुपारच्या सत्रात शेअर बाजारातील या तेजीने आणखी वेग पकडला. दुपारी एकच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 2 हजार अंकांची वाढ झाली होती. यामुळे गुंतवणुकदारांनी एका तासात 5 लाख कोटी रुपये कमावले.

मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार बाजारात तेजी आल्यानंतर काही मिनिटातच बाजारमुल्य 143.45 लाख कोटींवर पोहोचले. हेच बाजारमूल्य गुरुवारी 138.54 लाख कोटी इतके होते. याचाच अर्थ बाजार मुल्यात 5 लाख कोटींची वाढ झाली. शेअर बाजाराचा इतिहास पाहता 10 वर्षात प्रथमच एका दिवसात सेन्सेक्समध्ये 2 हजार २०० अंकांची वाढ झाली आहे. तर निफ्टीमध्ये देखील ६५० अंकांची वाढ झाली.

First Published on: September 21, 2019 1:03 AM
Exit mobile version