Crime News: शहरात दोन अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू, कांदिवली-गोरेगावातील घटना

Crime News: शहरात दोन अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू, कांदिवली-गोरेगावातील घटना

मुंबई: शहरात दोन अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवली आणि गोरेगावमध्ये घडली. मृतांमध्ये अर्चना अजय अंबेकर आणि श्याम श्रीलाल विश्‍वकर्मा यांचा समावेश आहे. याप्रकरणी बांगुरनगर आणि समतानगर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन डंपरचालक अमर किसन घायावत याला अटक केली. (Crime News Two people including a woman died in two accidents in the city incident in Kandivali Goregaon)

अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. अर्चना ही गोरेगाव येथे तिच्या बारा वर्षांच्या मुलासोबत राहत होती. तिच्या पतीचे सात वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते. तेव्हापासून ती घरकाम करत होती. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता ती कामावर गेली आणि दुपारी साडेतीन वाजता काम संपल्यानंतर घरी जात होती. गोरेगाव येथील न्यू लिंक रोड, शास्त्रीनगरच्या विबग्योर हायस्कूलसमोरुन रस्ता क्रॉस करताना तिला एका डंपरने धडक दिली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी डंपरचालक अमर घायावत याला लोकांनी पकडून बांगुरनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.

दुसरा अपघात

दुसरा अपघात गुरुवारी पहाटे सव्वाचार वाजता कांदिवलीतील ठाकूर व्हिलेजजवळील ब्रिजवर झाला. भरवेगात जात असताना श्याम विश्‍वकर्मा याचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने बाईकची डिवायडरला धडक दिली होती. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. श्याम हा कांदिवलीतील हनुमाननगर परिसरात राहत होता. बुधवारी रात्री तो त्याच्या मित्रासोबत ठाण्याला आणि नंतर मिरारोडला गेला होता. या दोन्ही ठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केले होते. मिरारोडवरुन घरी जाताना त्याच्या बाईकला अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी श्यामविरुद्ध समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


मुंबईत हॉटेल व्यवसायाची 27 लाखांची कॅश नोकराने पळवून नेली

मुंबई– नवीन हॉटेलच्या इंटेरियर डिझानिंग सामानासाठी आणलेले सुमारे २७ लाखांची कॅश नोकरानेच पळवून नेल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रार अर्जानंतर एमएचबी पोलिसांनी त्यांचा नोकर अरुणकुमार अकलेश राऊत (23) याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून, त्याचा शोध सुरु केला आहे.

अरुणकुमार हा बिहारचा रहिवाशी असून, तो बिहारला पळून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातील तक्रारदार सुरतचे व्यावसायिक असून ते त्यांच्या पत्नीसोबत राहतात. अरुणकुमार हा त्यांचा नोकर असून गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडे कामाला होता. त्यांना सुरत शहरात एक नवीन हॉटेल सुरु करायचे होते. त्यासाठी लागणारे साहित्य ते मुंबईसह भिवंडी येथून मागविणार होते. त्यासाठी ते दोन दिवसांपूर्वी त्यांच्या बोरिवलीतील फ्लॅटमध्ये अरुणकुमार आले होते. गुरुवारी ते भिवंडी येथे कामासाठी निघून गेले. यावेळी त्यांचा नोकर फ्लॅटमध्ये एकटाच होता. सायंकाळी चार वाजता ते घरी आले असता तिथे अरुणकुमार नव्हता. त्याचा मोबाईल बंद येत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी लॉकरमधील कॅशची पाहणी केली असता तिथे 27 लाखांची कॅश नव्हती. त्यांचा नोकर लॉकरमधून 27 लाखांची कॅश घेऊन पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी एमएचबी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अरुणकुमार राऊत याच्याविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अरुणकुमारविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अरुणकुमार हा मूळचा बिहारच्या शिवहर, मधुबनीचा रहिवाशी असून चोरीनंतर तो त्याच्या गावी पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एक टिम बिहारला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचा: Crime News: बर्गर, गर्लफ्रेंड अन् मित्राची हत्या…; नेमके काय आणि कुठे घडले? )

First Published on: April 26, 2024 9:42 PM
Exit mobile version