Bad Cop: दिल्लीचा पोलीस निरीक्षक महिलांना एकटं गाठून

Bad Cop: दिल्लीचा पोलीस निरीक्षक महिलांना एकटं गाठून

अटक करण्यात आलेला आरोपी

पोलिसांवर महिलांना सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी असते. मात्र काही घाणेरड्या विचारांची लोक पोलीस दलात सामील झाल्यामुळे ते खाकीला बदनाम करण्याचे काम करतात. दिल्ली पोलीस दलात एका पोलीस निरीक्षकाने खाकीला बदनाम करण्याचा प्रताप केला आहे. हा पोलीस रस्त्यावरुन जाणाऱ्या एकट्या महिलांना छेडायचा. महिलांना अश्लिल बोलायचा आणि जर एखाद्या महिलेने विरोध केलाच तर तिथून तो पळ काढायचा. अनेक महिलांनी वेगवेगळ्या पोलीस स्थानकात त्याची तक्रार केली होती. अखेर पोलिसांनी सापळा रचून जेव्हा आरोपीला अटक केली. तेव्हा तो पोलीस उपनिरीक्षक असल्याचे समजले. यामुळे दिल्ली पोलिसांची मान शरमेने खाली गेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव पुनीत गरेवाल आहे. दिल्ली पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर तो काम करतोय. सध्या दिल्ली ट्राफिक पोलीस डीसीपी यांचा पीए म्हणून तो कार्यरत होता. अटक झाल्यानंतर त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३५४ ड आणि ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुनीत मुळातच छिछोरा वृत्तीचा असल्याचे समोर आले आहे.

पुनीतला अटक केल्यानंतर आता अनेक महिलांनी समोर येऊन तक्रार द्यायला सुरुवात केली आहे. याआधी सामाजिक दबाव किंवा मानहानीच्या भितीपोटी कुणीही तक्रार करायला पुढे येत नव्हते. आरोपी पुनीत हा सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलांना छेडायचा. गुन्हा करण्यासाठी तो नंबर प्लेट नसलेली गाडी काढायचा. द्वारका परिसरात सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान तो अनेक मुलींना छेडायचा. काहींना अश्लील चाळे करुन दाखवायचा तर कधी अश्लील बोलायचा.

आरोपी पुनीतच्या छेडछाडीला कंटाळलेल्या एका तरुणीने त्याच्याविरोधात इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली. त्यानंतर अनेक मुलींनी या पोस्टला पाठिंबा देत पोलीस तक्रार करण्याचे धाडस दाखवले. त्यानंतर पोलिसांनी द्वारका परिसरात असलेले जवळपास २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यानंतर आरोपी ज्या गाडीतून फिरत होता, ती ओळखण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर सापळा रचून पुनीतला ताब्यात घेण्यात आले.

First Published on: October 26, 2020 10:52 PM
Exit mobile version