कुर्ला येथे शासकीय कंत्राटदारावर गोळीबार करणार्‍या चार आरोपींना अटक

कुर्ला येथे शासकीय कंत्राटदारावर गोळीबार करणार्‍या चार आरोपींना अटक

मुंबई : शासकीय कंत्राटदार म्हणून काम करणार्‍या सूरजप्रतापसिंग नरपतसिंग देवडा यांच्यावर गोळीबार करुन जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी चार आरोपींना कुर्ला पोलिसांनी अटक केली. सागर प्रदीप येरुणकर, करण अविनाश थोरात, अभिषेक शंकर सावंत आणि विनोद मधुकर कांबळे अशी या चौघांची नावे आहेत. चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध घाटकोपर, भोईवाडा पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सूरज देवडा हे व्यवसायाने शासकीय कंत्राटदार असून ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत दहिसर परिसरात राहतात. तिथेच त्यांच्या मालकीची धरम नावाची एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. या कंपनीकडे म्हाडासह इतर शासकीय कंत्राटाची काम येतात. काही दिवसांपूर्वी म्हाडाकडून काही शासकीय कामांचे टेंडर काढण्यात आले होते. ते टेंडर त्यांच्या कंपनीने भरले असून त्याची अमानत रक्कमही जमा केली होती. याच कामाच्या वादातून त्यांचा काही व्यक्तींशी वाद सुरू होता.

सोमवारी रात्री ते त्यांचा मित्र पंकजसोबत कारमधून कुर्ला येथील कापाडिया नगर परिसरातून येत होते. यावेळी त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता. या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र एक गोळी कारला लागली होती. गोळीबाराच्या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून या पथकाने भिवंडी येथील मुंबई आग्रा महामार्ग, शांग्रिला रिसोर्टसमोरील सिद्ध-दा-ढाबा परिसरात लपलेल्या सागर येरुणकर, करण थोरात, अभिषेक सावंत आणि विनोद कांबळे या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांचा या गोळीबाराच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या चौघांनाही पोलिसांनी अटक केली.

चार वर्षांच्या मुलाचे अपहरण करणार्‍या आरोपीस अटक
चार वर्षांच्या मुलाचे अपहरण करणार्‍या एका आरोपीस वनराई पोलिसांनी अटक केली. नरेश शिवप्रसाद वर्मा असे या आरोपीचे नाव असून त्याच्या तावडीतून या मुलाची सुटका करण्यात आली आहे. त्याचा ताबा त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आला आहे. दारुच्या नशेत त्याने या मुलाचे अपहरण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

राजेश लालमणी यादव हे गोरेगाव येथे राहत असून ते चालक म्हणून काम करतात. त्यांना अर्णव नावाचा चार वर्षांचा मुलगा आहे. मंगळवारी रात्री दहा वाजता अर्णव हा खेळायला जातो असे सांगून घरातून निघून गेला. मात्र बराच वेळ होऊन तो परत घरी आला नव्हता. सर्वत्र चौकशी करुनही अर्णवचा कुठेच पत्ता नव्हता. अर्णवचे कोणीतरी अपहरण केल्याची शक्यता व्यक्त करुन ते दोघेही वनराई पोलीस ठाण्यात आले. अर्णवचा शोध सुरू असतानाच समतानगर पोलिसांना तो सापडला. समतानगर पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत असताना नरेश वर्मासोबत अर्णव दिसला. नरेशची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या चौकशीत त्यानेच अर्णवचे अपहरण केल्याची कबुली दिली.

First Published on: January 13, 2023 9:54 PM
Exit mobile version