भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंह यांची एसीबीकडून चौकशी, अनुप डांगेंनी केला होता आरोप

भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंह यांची एसीबीकडून चौकशी, अनुप डांगेंनी केला होता आरोप

पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एसीबीकडे आपला जबाब नोंदवला आहे. अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दखल घेत खुल्या चौकशीला हजर राहण्यासाठी परमबीर सिंह यांना तीन वेळा समन्स बजावला. मात्र यातील दोन समन्सला वेळ वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली होती.

मात्र 2 फेब्रुवारीला एसीबीने तिसऱ्या समन्सला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु 2 फेब्रुवारीला परमबीर सिंह यांचे सुप्रीम कोर्टात काही काम असल्याने त्यांनी एसीबीला 1 फेब्रुवारीला जबाब नोंदवण्याची विनंती केली होती. या विनंतीनुसार एसीबीने 1 फेब्रुवारीला दुपारी त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

या चौकशीदरम्यान परमबीर सिंह यांनी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केलेले भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळून लावल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या चौकशीतून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांना एसीबीकडून पुन्हा चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर परमबीर सिंह यांच्या विरोधातही मुंबईसह इतर ठिकाणाहून गैरकारभार आणि भ्रष्टाचारांच्या तक्रारीचे सत्र सुरू झाले होते.

पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या भ्रष्टाचाराच्या आरोपांची एसीबीने गंभीर दखल घेत चौकशी सुरु केली.

परमबीर सिंह यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले, तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणात खंडणी वसुली केली होती. मुंबई आणि ठाणे शहराचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी अनेकांना गुन्ह्यांत अटक तसेच मोक्का कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती. याबाबत काही बुकींसह बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली आहे. या सर्व तक्रारीच्या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परमबीर सिंह यांची खुली विभागीय चौकशी सुरू केली आहे.


 

First Published on: February 2, 2022 11:08 AM
Exit mobile version