चार वर्षांच्या मुलाचे अपहरण,  सुरक्षारक्षकाला अटक

चार वर्षांच्या मुलाचे अपहरण,  सुरक्षारक्षकाला अटक

चार वर्षांच्या मुलाचे अपहरण करुन पळून गेलेल्या एका सुरक्षारक्षकाला मालाड पोलिसांनी अटक केली. मुकेश सिंग असे या आरोपीचे नाव असून त्याच्या तावडीतून पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलाची सुखरुप सुटका केली. त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पैशांसाठी मुकेशने या मुलाचे अपहरण केल्याचे उघडकीस आले आहे.

मूळचा कोलकाताचा रहिवाशी असलेला कुर्बान फुलबा मोमीन शेख हा मालाड परिसरात त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतो. मोहम्मद आयप हा त्याचा चार वर्षांचा लहान मुलगा आहे. या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरु असून तिथे तो मजुरीचे काम करतो. त्याच्यासोबत इतर काही मजुर कामगार त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मालमत्तेच्या सुरक्षेसाठी बिल्डरने मुकेश सिंग या सुरक्षारक्षक म्हणून कामावर ठेवले होते. एकाच परिसरात काम करीत असल्याने तो कुर्बानसह त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांच्या परिचित आहेत. अनेकदा तो त्याच्या मुलांना खाऊ देत होता, त्यांना फिरायला घेऊन जात होता. मंगळवारी कुर्बान नेहमीप्रमाणे कामावरुन गेला आला. यावेळी त्याची पत्नी मार्केटमध्ये गेली होती. ती मार्केटमधून मासे घेऊन घरी आल्यानंतर ते दोघेही काम करीत होते. यावेळी तिथे मुकेश आला आणि त्याने त्यांच्याकडे मासे मागितले. मासे बनवून दिल्यानंतर तो मोहम्मद आयपला घेऊन गेला. बराच वेळ होऊन तो त्याला घेऊन आला नाही. त्यामुळे कुर्बानसह इतर कामगारांनी या दोघांचा शोध घेतला. मात्र मोहम्मद आयप आणि मुकेश त्यांना कुठेच दिसले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच कुर्बानने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत मुकेशविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना काही तासात मुकेशला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून या मुलाची सुटका करुन त्याला पालकांच्या स्वाधीन केले.  मुकेशला पैशांची गरज होती. त्याने कुर्बानकडे पैशांची मागणी केली. मात्र त्याने त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. त्यातून रागाच्या भरात त्याच्या मुलाचे अपहरण करुन त्याच्याकडे पैशांची मागणी करण्याची योजना बनविली होती, असे चौकशीतून उघड झाले. मात्र अपहरणानंतर काही तासात त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

First Published on: May 19, 2022 9:52 PM
Exit mobile version