जबरदस्त! विमानातून यायचे चोरी करून जायचे; मुंबईत येताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जबरदस्त! विमानातून यायचे चोरी करून जायचे; मुंबईत येताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबईत भरदिवसा घरफोडी करून राजधानी एक्सप्रेसने इतर राज्यात पळून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीस जेरबंद करण्यात मुंबईतील मालाड पोलिसांना यश आल आहे. या टोळीचा दिल्लीतील 100 हून अधिक गुन्ह्यात सहभाग असल्याचा समोर आले आहे. गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ या टोळीने दिल्लीत धुमाकूळ घातला होता, मात्र ही टोळी मुंबईत येताच मालाड पोलिसांनी पहिल्याच प्रयत्नात तिला जेरबंद केलं आहे. कहर म्हणजे हे चोर मुंबईत चोरी करण्यासाठी विमानाने आले होते, यात पाच चोरांचा समावेश होता, यातील दोन चोर चोरी करून पुन्हा विमानाने परत गेले, मात्र मुद्देमाल घेऊन जाणाऱ्या तीन चोरांना मालाड पोलिसांनी मध्यप्रदेशातील रतलाममधून अटक केली आहे. त्यांच्याकडून 1.7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील लिबर्टी गार्डनमधील एका तीन मजली इमारतीमध्ये दिवसाढवळ्या एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाली. या घरातील कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम, लॅपटॉप, सोन्या -चांदीचे दागिने अशी एकूण 1,87,500 रुपयांची मालमत्ता चोरीला गेली, याप्रकरणी 11 जानेवारी रोजी मालाड पोलीस ठाण्य़ात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत मालाड पोलिसांनी तपासासाठी पथकं तयार केली.

मात्र ज्या ठिकाणी चोरी झाली त्याठिकाणी चोरांनी कसलाही पुरावा ठेवला नव्हता. तसेच परिसरात CCTV नसल्याने चोरांना पकडणे आव्हान होते. मात्र गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील खाजगी व सरकारी असे मिळून एकूण 70 ते 80 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली. यावेळी संशयित आरोपी कुर्ला परिसरातील एका लॉजवर थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र पोलीस त्या ठिकाणी पोहचले त्या आधीच संशयित चोर मुंबई सेंट्रल टर्मिनस येथे गेल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस मुंबई सेंट्रल टर्मिनस पोहचले त्यावेळी संशयित राजधानी एक्सप्रेसने निघून गेल्याची माहिती समोर आली. यावेळी मालाड पोलिसांनी राजधानी एक्सप्रेसवर त्यावेळी कार्यरत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क करत आरोपींचे फोटो पाठवले. त्यानुसार रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बल यांच्या मदतीने तीन आरोपींना मध्य प्रदेशच्या रतलाममधून ताब्यात घेण्यात आले.

यावेळी अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदार विमानाने पळून गेल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपींनी मुंबईसह ठाणे आणि आजुबाजूच्या जिल्ह्यांमध्येही गुन्हे केल्याचे कबुल केले. हे सर्व आरोपी पश्चिम बंगालमधील असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीकडून पोलिसांनी लोखंडी कटावणी, पक्कड, कटर, स्कु ड्रायवर, चाव्यांचा जुडगा अशी घरफोडीची हत्यारे तसेच विविध ठिकाणाहून चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल तसेच महागडी घडयाळे अशा प्रकारचा मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


बंगळुरूमध्ये दुचाकी स्वारानं वृद्धाला नेलं फरफटत , व्हिडीओ व्हायरल

First Published on: January 17, 2023 9:29 PM
Exit mobile version