केरळमध्ये ‘निपाह’ व्हायरसची दहशत; ९ जणांचा मृत्यू

केरळमध्ये ‘निपाह’ व्हायरसची दहशत; ९ जणांचा मृत्यू

फ्रुट वटवाघळापासून 'निफा' ची लागण होत आहे.

‘निपाह’ व्हायरसमुळे केरळमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या १२ तासात या व्हायरसची लागण होऊन ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण या व्हायरसच्या कचाटयात सापडले आहे. केरळच्या कोझीकोडे भागात एकाच घरातील तिघांचा मृत्यूनंतर केलेल्या तपासणीत हा व्हायरस निदर्शनास आला आहे. त्यामुळे या भागात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून केरळमधील कोझीकोडे आणि मालापुरम भागामध्ये मृत्यूतांडव माजले आहे. अचानक कोणत्या आजाराने डोके वर काढले याचा तपास करण्यासाठी या आजाराने पीडित असलेल्या रुग्णांचे रक्त तपासण्यात आले. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीला पाठवण्यात आले. या रक्ताच्या नमुन्यात ‘निपाह’ व्हायरस असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता केरळमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. WHO नुसार  हा जिवघेणा व्हायरस एक नवा आजार असून जो मनुष्य आणि प्राण्यांमध्येही पसरु शकतो. या रोगाला पसरण्यापासून रोखण्यासाठी सरकारनं हाय अलर्ट घोषित केले आहे.

काय आहे ‘निपाह’ व्हायरस

‘निपाह’ व्हायरस हा संसर्गजन्य आजार असून वटवाघुळांपासून हा आजार पसरत असल्याचे समोर आले आहे. १९९८ साली हा आजार पहिल्यांदा मलेशियामध्ये आढळला होता. त्यावेळी हा आजार डुकरांना होत होता. त्यानंतर खजुराची शेती करणाऱ्या लोकांना या फ्रूट वटवाघूळापासून हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आणि त्यानंतर हा आजार माणसांना होऊ लागला. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे संपर्कात येऊन हा आजार अधिक पसरत गेला आणि आता केरळमध्ये पुन्हा एकदा या आजाराने डोके वर काढले आहे.

‘निपाह’ ची लक्षणे

निपाहची लागण झाल्यास मेंदूला सूज येते. ताप, डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत. हा संसर्ग शरीरात भिनल्यास माणूस कोमात देखील जाऊ शकतो आणि त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

‘निपाह’ पासून कसे वाचाल?

निपाह हा संसर्गातून पसरत असल्याने अशी लक्षण असलेल्या रुग्णांपासून लांब रहा. शिवाय तुम्हाला या लक्षणांपैकी काही होत असल्यास डॉक्टरांचा योग्य सल्ला वेळीच घ्या

First Published on: May 21, 2018 9:33 AM
Exit mobile version