अकरा वर्षांच्या मुलाने १७ सेकंदात बँकेतून लंपास केले १० लाख

अकरा वर्षांच्या मुलाने १७ सेकंदात बँकेतून लंपास केले १० लाख

प्रातिनिधिक छायाचित्र

मध्य प्रदेशच्या जिल्हा सहकारी बँकेत एक विचित्र प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशच्या जावद शहरातील जिल्हा सहकारी बँकेतून एका ११ वर्षाच्या मुलाने अवघ्या १७ सेकंदात १० लाख रुपये लंपास केले. चोरीच्या ३० तासांनंतरही पोलिसांना या मुलाचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. पोलिसांनी बँकेच्या आजुबाजूला असलेल्या गावांमध्ये जाऊन तपास केला. बाहेर गावारुन आलेल्या लोकांच्या घरांची तपासणी केली, ढाब्यावर चौकशी केली, अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.

जावद येथील बँकेत मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे काम सुरु झाले होते. बँकेचा सुरक्षा रक्षक रणजीत राठोडने ५०० नोटांचा बंडल असलेले २० लाख रुपये कॅशियरच्या केबिनमध्ये ठेवले. त्याचवेळी कॅशिअर दानिश खान पेटी आणण्यासाठी लॉकर जवळ गेले. त्याचवेळी संधी साधून एक ११ वर्षांच्या आसपास वय असलेला मुलगा कॅशियरच्या केबिनमध्ये घुसला आणि त्याने नोटांचे बंडल पिशवीत टाकून १७ सेकंदात निघूनही गेला. लॉकरमधून जेव्हा कॅशियर पुन्हा आला तेव्हा त्याला पैसे कमी असल्याचे दिसले. त्याने तात्काळ बँकेचे मॅनेजर एलएन मीणा यांना याबाबत सूचना दिली. मीणा यांनी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका लहान मुलाने ही चोरी केली असल्याचे समोर आले.

या चोरीनंतर बँकेतील कर्मचाऱ्यांची कुचराई समोर आली आहे. बँकेतील कॅशिअर हे नेहमी आपली केबिन बंद ठेवत असतात. जर कॅशिअरला केबिन सोडायची असेल तर केबिन लॉक करुनच त्याला जावे लागत असते. तरिही या बँकेतील कॅशिअरने केबिनचा दरवाजा लॉक केला नव्हता.

जावद शहर हे नीमच या जिल्ह्यात येते. येतील पोलीस अधीक्षक मनोज कुमार राय यांनी सांगितले की, येथे लहान मुलांची गँग सक्रीय आहे. काही दिवसांपूर्वी मनासा येथे एका शेतकऱ्याच्या बॅगेतून देखील ८० हजारांची चोरी झाली होती. एवढे पैसे चोरी करणाऱ्या या मुलांचा तपास सुरु असून लवकरच त्यांना जेरबंद केले जाईल, असे मनोज कुमार राय यांनी सांगितले.

First Published on: July 15, 2020 11:17 PM
Exit mobile version