अन्… भावासाठी तिनं बिबट्यालाच घेतलं अंगावर!

अन्… भावासाठी तिनं बिबट्यालाच घेतलं अंगावर!

उत्तराखंडच्या पौरी गढवाल तालुक्यातील ११ वर्षीय मुलीने तिच्या ४ वर्षीय भावाचा बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर ती मुलगी जखमी झाली असून तिच्यावर दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिच्या या धाडसी कृत्यानंतर राज्य सरकारने शौर्य पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे तिच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी घडली घटना

उत्तराखंडच्या पौरी गढवाल तालुक्यातील देवकुंडाई गावात राहणारी राखी आपल्या भावासोबत शेतातून घरी परतत असताना वाटेत त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्याच क्षणी ११ वर्षीय राखीने आपल्या ४ वर्षीय भावाला आपल्या कवेत घेतले. बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवला. पण तरीही तिने आपल्या मिठीतून भावाला सोडले नाही. थोड्यावेळाने तिची आई त्या ठिकाणी दाखल झाली. आईने आरडाओरडा करताच बिबट्या पसार झाला. बिबट्याच्या हल्ल्यात राखीच्या डोक्याला आणि खांद्यांना जखमा झाल्या. सुरुवातीला कोटवाडमधील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला दिल्लीमध्ये पाठवण्यात आले.

शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करणार

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी धीरज सिंग यांनी राखीच्या धाडसी कृत्याची दखल घेत शौर्य पदकासाठी तिच्या नावाची केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल अशी माहिती दिली. ते म्हणाले की, “पहिल्यांदा जिल्हा प्रशासन राज्य सरकारकडे तिच्या नावाची शिफारस करेल. त्यानंतर राज्य सरकार राखीच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे करेल.”

First Published on: October 9, 2019 10:17 PM
Exit mobile version