यावर्षी २,२९३ पक्ष लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात

यावर्षी २,२९३ पक्ष लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात

भारतातील राजकीय पक्ष आणि त्यांचे चिन्ह

‘भरोसा पार्टी’, ‘सबसे बडी पार्टी’ आणि ‘राष्ट्रीय साफ निती पार्टी’ या अजब गजब नावासहीत देशभरातून २ हजार २९३ राजकीय पक्ष लोकसभा निवडणूक २०१९ साठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ९ मार्चपर्यंत जेवढ्या पक्षांची नोंदणी झाली आहे, त्याची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. त्यानुसार दोन हजाराहून अधिक पक्ष निवडणूक लढवत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ७ राष्ट्रीय पक्ष असून ५९ प्रादेशिक पक्ष आहेत. तसेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तब्बल १४९ पक्षांनी नव्याने नोंदणी केली असल्याचेही आयोगाने सांगितले आहे.

यावर्षी फेब्रुवारीपर्यंत एकूण २ हजार १४३ पक्षांनी आयोगाकडे अधिकृत नोंदणी केली होती. त्यापैकी मागच्यावर्षी मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगढ राज्यात निवडणुका झाल्या तेव्हा नव्या ५८ पक्षांनी नोंदणी केली होती. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात १४९ पक्षांनी राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. यामध्ये बिहार येथे बहुजन आझाद पार्टी, उत्तर प्रदेशच्या कानपूर येथून सामूहिक एकता पार्टी, जयपूर येथून राष्ट्रीय साफ निती पार्टी, दिल्लीतून सबसे बडी पार्टी, तेलंगणा येथून भरोसा पार्टी तर तामिळनाडूमधून न्यू जनरेशन पीपल्स पार्टीने आपल्या नावांची नोंदणी केली आहे.

यावर्षी नव्याने नोंदणी झालेल्या १४९ पक्षांना अद्याप अधिकृत चिन्ह देण्यात आलेले नाही. निवडणूक आयोग जे चिन्ह देईल, त्यावर त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या चिन्हांमधून एक चिन्ह पक्षाला निवडावे लागेल. सध्या आयोगाने ८४ चिन्हांची यादी तयार केलेली आहे.

आपल्या पक्षाला अधिकृत दर्जा मिळवण्यासाठी आयोगाने निश्चित केलेली मतांची टक्केवारी राज्य किंवा राष्ट्रीय निवडणुकांमध्ये गाठावी लागते. शिवाय जर विधानसभा किंवा लोकसभेत आयोगाने ठरवून दिलेल्या संख्येत जर सदस्य निवडून आले तरी देखील त्या पक्षाला अधिकृत दर्जा दिला जातो.

First Published on: March 18, 2019 5:00 PM
Exit mobile version