जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला एकाचा मृत्यू, तर पोलिसांसह २४ जण जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला एकाचा मृत्यू, तर पोलिसांसह २४ जण जखमी

Baramulla Encounter : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक, २ ठार तर ४ जणांचा तपास सुरू

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. श्रीनगरमधील अमिरा कदल मार्केटमध्ये दहशतवाद्यांनी रविवारी सुरक्षा दलांना लक्ष्य करत ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांसह २४ जण जखमी झाले आहेत. २४ जणांमध्ये २३ नागरिक आणि एका पोलिसाचा समावेश आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एक पोलीस कर्मचारी आणि एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

श्रीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला होता. हल्ल्यानंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. हल्ल्याच्या एक दिवस अगोदर जम्मू- काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात दहशतवादी लपून बसले होते आणि तेथूनच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. दहशतवाद्यांच्या ठिकाणाहून दोन अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर, एक एके-47 मॅगझिन, इन्सास रायफलच्या ४८ गोळ्या, एके-47 च्या १० राऊंड, ९ एमएम शस्त्राच्या ३८ राऊंड, चिनी पिस्तूलच्या दोन राऊंड, एक चाकू आणि आणखी एक धारदार शस्त्र जप्त करण्यात आले होते.

याआधीही दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीरच्या विविध जिल्ह्यात अशा प्रकारच्या कुरापती करण्यात आल्या आहेत. अनेकांना पकडण्यातही आले आहे. वास्तविक, जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दल सतत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात गुंतलेले असतात. विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत असून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले जात आहे. त्यामुळे दहशतवादी संतापले असून अशा हल्ल्यांद्वारे आपले कटकारस्थान राबवत आहेत.

First Published on: March 7, 2022 4:00 AM
Exit mobile version