प्रतापी शाळा; ४५ हजार उत्तरपत्रिका रद्दीत!

प्रतापी शाळा; ४५ हजार उत्तरपत्रिका रद्दीत!

४२,५०० उत्तरपत्रिका भंगारवाल्याला विकल्या? ( फोटो सौजन्य - ANI )

बिहारमध्ये शिक्षणाचे कशा प्रकारे बारा वाजले आहेत याची प्रचिती देणारे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तब्बल ४२,५०० उत्तरपत्रिका रद्दीमध्ये सापडल्या आहेत. केवळ ८५०० रूपयांमध्ये या उत्तरपत्रिकांची खरेदी झाल्याची बाब आता समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. बिहार शिक्षण विभागाच्या गलथान कारभारावरून आता देशभरातून टीका होत आहे.

बिहारमधील गोपालगंज येथील एस. एस. इंटर कॉलेजमधून ४२,५०० उत्तरपत्रिका केवळ ८५०० रूपयांना भंगारवाल्याला विकण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकाराने राज्यातील शिक्षण व्यवस्था हादरून गेली आहे. याप्रकरणी रद्दीवाला पप्पू कुमार गुप्ता आणि शिक्षा चालक संजय कुमारला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.या प्रकारामुळे शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याची चौफेर टीका होत आहे. अटक करण्यात आलेला रद्दीवाला पप्पू कुमार गुप्ता हा शाळेचे प्रत्येक भंगार आणि रद्दी विकत घेतो. पण, यावेळी तब्बल ४२,५०० उत्तरपत्रिका सापडल्याने घटनेचे गांभीर्य वाढल्याने पप्पू कुमार गुप्ताची सखोल चौकशी होत आहे. अशी माहिती गोपालगंजचे एसपी रशिद झमान यांनी दिली.

बिहार बोर्डाचे प्रताप!

शैक्षणिक क्षेत्रातील बिहार बोर्डाचा गलथान कारभार काही पहिल्यांदाच होतोय असे नाही. यापूर्वी देखील बिहार शिक्षण विभागाचे अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. त्यामध्ये आता नव्या पण धक्कादायक प्रकरणाची भर पडली आहे. २०१६ साली बारावीमध्ये रूबी राय ही विद्यार्थिनी राज्यामध्ये पहिली आली होती. पण, त्यानंतर समोर आलेले सत्य मात्र चक्रावून सोडणारे होते.

मला केवळ पास करा असे मी बाबांना सांगितले होते. पण, त्यांनी तर मला राज्यात पहिले आणले’ अशी प्रतिक्रिया रूबी राय विद्यार्थिनीने दिली. याप्रकरणावरून बिहार शिक्षण बोर्डाची अब्रु वेशीला टांगली गेली होती. शिवाय, शिक्षण व्यवस्थेवर देखील मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. पण, दोन वर्षानंतर देखील परिस्थिती जैसे थे! शिवाय, अनेक विद्यार्थ्यांना एकूण गुणांपेक्षा जास्त गुण मिळाल्याची बातमी देखील एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये आली होती. अगदी साध्या भाषेत सांगायचे झाले तर, काही विद्यार्थ्यांना ३५ पैकी ३८ किंवा ३७ मार्क मिळाल्याची बाब समोर आली होती. तर, जान्हवी सिंग या विद्यार्थिनीने बारावीचा बायोलॉजीचा पेपर न सोडवता देखील तिला १८ मार्क मिळाल्याचे समोर आले होते. अशाच प्रकारच्या अनेक घटना बिहारच्या कानाकोपऱ्यात घडल्या आहेत. यावरूनच बिहार शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराचा अंदाज बांधता येतो.

First Published on: June 24, 2018 2:20 PM
Exit mobile version