बिकानेर-गोहाटी एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले

बिकानेर-गोहाटी एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले

राजस्थानमधील बिकानेरहून आसामच्या गोहाटीला जाणार्‍या बिकानेर-गोहाटी एक्स्प्रेस (१५६३३) या ट्रेनला पश्चिम बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यात मोठा अपघात झाला. या ट्रेनचे १२ डबे रुळावरून घसरले. या अपघातात रात्री उशिरापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मी स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना बचाव कार्याबाबत अवगत करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन टीम घटनास्थळी पोहचल्या असून बचावकार्य सुरू आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये, गंभीर जखमींना एक लाख रुपये आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

ही ट्रेन राजस्थानमधील बिकानेरहून आसामच्या गोहाटीकडे बिहारमधील पाटणामार्गे जात होती. संध्याकाळी ५.१५ वाजता जलपायगुडी जिल्ह्यातील मैनागुरी येथे या ट्रेनचे १२ डबे रुळावरून घसरले. या ट्रेनला जे ३४ थांबे होते त्यापैकी मैनागुरी हा एक थांबा होता. जलपायगुडी जिल्ह्यातून ट्रेन जात असताना हा अपघात झाला.

ट्रेनमध्ये एकूण १,२०० प्रवासी होते त्यापैकी १७७ प्रवासी बिकानेर आणि ९८ प्रवासी पाटणा जंक्शन येथून ट्रेनमध्ये चढले होते. एक मोठा धक्का बसला आणि अनेक डबे रुळावरून खाली घसरले, असे एका प्रवाशाने सांगितले.

First Published on: January 14, 2022 6:10 AM
Exit mobile version