तुमचे ४९ तर आमचे ६२; सेलिब्रिटिंमध्ये लेटर वॉर!

तुमचे ४९ तर आमचे ६२; सेलिब्रिटिंमध्ये लेटर वॉर!

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुलं पत्र पाठवून देशभरातल्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४९ सेलिब्रिटिंनी मॉब लिंचिंग आणि वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांवर चिंता व्यक्त केली होती. तसेच, यावर त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी केली होती. मात्र, आता त्याला विरोध करणारं एक नवीनच पत्र इतर ६२ सेलिब्रिटिंनी लिहिलं आहे. या सेलिब्रिटिंनी आधीच्या ४९ सेलिब्रिटिंना एकांगी ठरवत मोदींनी कशा पद्धतीने या सगळ्याच्या विरुद्ध वेळोवेळी पावलं उचलली आहेत, हे नेटाने पटवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी आणि देशातल्या असहिष्णुतेच्या घटना यावरून देशभरातल्या सेलिब्रिटिंमध्ये एक वेगळंच ‘लेटर वॉर’ सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये अभिनेत्री कंगणा राणावत, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी, क्लासिकल डान्सर सोनल मानसिंघे, ग्रॅमी अवॉर्ड विजेते वादक पं. विश्वमोहन भट, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर, विवेक अग्निहोत्री, अशोक पंडित, अभिनेत्री पल्लवी जोशी, फोक आर्टिस्ट मालिनी अवस्थी, अभिनेते मनोज जोशी, विश्वजीत चटर्जी अशा सेलिब्रिटिंचा समावेश आहे.


हेही वाचा – मॉब लिंचिंगविरोधात ४९ सेलिब्रिटींनी पाठवले पंतप्रधान मोदी यांना पत्र

‘एकांगी निषेध आणि चुकीचे आक्षेप’

‘एकांगी निषेध आणि चुकीचे आक्षेप’ असं शीर्षक असलेल्या या पत्रामध्ये या ६२ सेलिब्रिटिंनी अनेक आक्षेप घेतले आहेत. ‘आधी पत्र लिहिलेले सेलिब्रिटी स्वघोषित रक्षक झाले असून राजकीयदृष्ट्या एकांगी भूमिका घेणारे आहेत, असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच, या पत्रामध्ये भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी सकारात्मक राष्ट्रवाद आणि मानवतावादाचा पुरस्कार करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांना नकारात्मक पद्धतीने या पत्रात दाखवण्यात आलं आहे’, असा दावा नव्या पत्रामध्ये करण्यात आला आहे. ‘जेव्हा भारतामध्ये आदिवासी आणि अल्पसंख्याक समाज नक्षलवादाच्या भक्ष्यस्थानी पडत होता, तेव्हा हे सगळे सेलिब्रिटी शांत बसले होते. काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी शाळा उडवण्याची धमकी देण्यात आली, तेव्हा देखील हे शांत बसले होते’, असं या पत्रात म्हटलं आहे.

‘मोदींच्या काळात सर्वाधिक स्वातंत्र्य’

दरम्यान, ‘मोदींच्या काळात सरकारवर मतभेद असण्याचं, टीका करण्याचं सर्वाधिक स्वातंत्र्य मिळत असून याआधी ते कधीही दिले गेले नव्हते’, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. तसेच, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार मॉब लिंचिंग आणि त्याप्रकारच्या घटनांचा निषेध केला असून त्यावर कारवाई करण्यासाठी पूरेपूर प्रयत्न केले असताना अशा प्रकारे त्यांना टार्गेट करणं चुकीचं आहे’, असं देखील या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

First Published on: July 26, 2019 6:57 PM
Exit mobile version