२४ तासांत काश्मीरमध्ये ७ दहशतवादी ठार

२४ तासांत काश्मीरमध्ये ७ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये २४ तासांत पाकिस्तानी दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलांमध्ये तब्बल चार चकमकी उडाल्या. त्यात भारतीय जवानांनी ७ दहशतवाद्यांना ठार मारले. या चकमकी शोपिया, बांदीपोरा आणि सोपोरमध्ये झाल्या आहेत. दहशतवाद्यांनी बचावासाठी एका १२ वर्षीय मुलाला ओलीस ठेऊन नंतर त्याची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या २४ तासांत ७ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असून ७ जवान जखमी झाल्याचे, पोलिसांकडून सांगण्यात आले. बंदीपोरा जिल्ह्यातील मीर मोहल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले आहे. यापैकी एक दहशतवादी मोस्ट वॉन्टेड होता. अनेक नागरिकांच्या हत्या त्याने घडवून आणल्या होत्या. दोघांकडूनही मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला, असे बंदीपोराचे विशेष पोलीस अधीक्षक राहुल मलिक यांनी सांगितले.

दहशतवाद्यांनी एक १२ वर्षीय मुलगा व अन्य एका ६० वर्षीय व्यक्तीला ओलीस ठेवले होते. यापैकी मुलाला वाचवण्यात जवानांना यश आले नाही. मुलाच्या सुटकेसाठी त्याचे आई-वडील दहशतवाद्यांपुढे वायरलेस मेसेजद्वारे विनवण्या करत होते मात्र, कोणतीही दयामाया न दाखवता दहशतवाद्यांनी या निष्पाप मुलाची हत्या केली. लष्करचा कमांडर ठार चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या एका कमांडरचाही समावेश आहे. शोपिया जिल्ह्यातील इमाम साहिब भागात दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. या चकमकीनंतर सोपोरमधील शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आली असून मोबाइल आणि इंटरनेट सेवाही तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

First Published on: March 23, 2019 5:50 AM
Exit mobile version