बापरे! तब्बल 760 कंपन्यांनी केली साडेपाच लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात

बापरे! तब्बल 760 कंपन्यांनी केली साडेपाच लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात

गेल्या काही महिन्यांत जगातील अशा अनेक नामवंत कंपन्या आहेत, ज्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात (Reduction of staff) केली आहे. ज्यामुळे आजपर्यंत तब्बल ५ लाख ३८ हजार कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कर्मचाऱ्यांची कपात ही टेक कंपन्यांमध्ये (IT Companies) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

एका अहवालाने दिलेल्या माहितीनुसार, जगातील नामवंत कंपन्यांनी केलेल्या कर्मचारी कपाताचा सर्वाधिक फटका हा आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बसला आहे. वाढती महागाई आणि कंपन्यांचे कोलमडलेले बजेट यांमुळे गेल्या काही महिन्यात अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये घट करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या कपातीत सर्वात प्रथम सुरूवात ही अमेरिकेतून करण्यात आली. साधारणतः आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली. त्यानंतर भारतातही आयटी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. तर युरोपमधील देखील असे अनेक देश आहेत, जिथे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या कर्मचारी कपातीत मात्र उर्जा क्षेत्रातील कर्मचारी हे सुरक्षित राहिले आहेत.

स्वित्झर्लंडमधील युबीएस ही सर्वात मोठी बँक सुद्धा कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. ही बँक एक किंवा दोन हजार नाही तर तब्बल ३६ हजार कर्मचाऱ्यांची कपात करू शकते. या बँकेने इतकी मोठी कपात केली तर जागतिक पातळीवरील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात ठरू शकते. बँकेने गेल्या महिन्यात क्रेडिट सुईस या बुडीस गेलेल्या बँकेचे अधिग्रहण केले होते. तंत्रज्ञान क्षेत्राशिवाय रिअल इस्टेट, दूरसंचार या क्षेत्रात देखील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे केवळ २४ कंपन्यांमधील २.७ लाख कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

अहवालाच्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, ॲमेझॉन कंपनीने २७ हजार १०१ कर्मचाऱ्यांची कपात केल्याने ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कपात ठरली आहे. त्यानंतर फेसबूकच्या मेटा कंपनीने २१ हजार कर्मचाऱ्यांची आणि ॲक्सेंचर कंपनीने १९ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून मोठा धक्का दिला होता. तर अल्फाबेटने १९ हजार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीने ११ हजार १२० कर्मचाऱ्यांची आजवर कपात केलेली आहे.

का करण्यात येतेय कर्मचाऱ्यांची कपात?
महागाई आणि मध्यवर्ती बँकांनी वाढविलेले व्याजदर, हे कर्मचारी कपातीचे सर्वात मोठे कारण आहे. तसेच महागाईमुळे खर्च वाढला. व्याजदर वाढीमुळे कंपन्यांचेही बजेट कोलमडले आहे. तर दुसरीकडे कच्चा माल महाग झाला आहे. त्यामुळे कंपन्यांनी आता आपला हात आखडता घेत कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरूवात केली आहे आणि याचा पहिला फटका बसला तो आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना. तसेच, कोरोना काळातील गरज पाहून आयटी क्षेत्र तसेच ऑनलाईन शिक्षण, फुड तसेच ई-कॉमर्स कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भरती केली होती. पण कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर या क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ सर्वप्रथम कमी करण्यात आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेसह काही देशांमध्ये व्याजदरात नुकतीच वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे परिस्थिती अद्यापही सुधारलेली नसून येत्या काही महिन्यांत आणखी काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – आजपासून BA ची परीक्षा, अवघे 12 तासआधी दिले हॉलतिकीट

First Published on: April 12, 2023 8:24 AM
Exit mobile version