घरमुंबईBA परीक्षेचे हॉल तिकीट 12 तास आधी मिळाले, विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा...

BA परीक्षेचे हॉल तिकीट 12 तास आधी मिळाले, विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

Subscribe

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा (Mumbai University) भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कला शाखेच्या (BA Exam) तृतीय वर्षाची आजपासून (12 एप्रिल) सहाव्या सत्राची परीक्षा सुरू होत आहे, मात्र परीक्षेच्या १२ तास आधी विद्यार्थ्यांना लॉगीनमध्ये हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेचे हॉलतिकिट (Hall Ticket) वेळेवर न मिळाल्याने विद्यार्थी चांगलेच हवालदिल झाले होते. त्यातच अंतिम वर्षाच्या पाचव्या सत्र परीक्षेचा निकालही अद्याप जाहीर झालेला नाही आहे.

तृतीय वर्ष कला शाखेची परीक्षा आजपासून (12 एप्रिल) सुरू होत आहे. त्यामुळे परीक्षेच्या काही दिवस आधीच विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळणे आवश्यक होते, मात्र हॉलतिकीट वेळेवर देण्यात मुंबई विद्यापीठला अपयश आले. काही विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट वेळेवर न मिळाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविषयी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी तातडीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देऊन यात लक्ष घालण्याची विनंती केली. तसेच त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेमणुकीखाली सुरू असलेल्या कारभाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. विद्यापीठाचा सर्व कारभार प्रभारी अधिकारी सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना विद्यापीठाच्या कामकाजाकडे आवश्यक वेळ देता येत नसल्याचे युवासेनेने शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

- Advertisement -

माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी परीक्षेच्या महिनाभर आधी हॉलतिकीट उपलब्ध करून देण्याचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सांगितले की, पाचव्या सत्र परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही आहे. त्यात विद्यार्थी सहाव्या सत्राची परीक्षा देत आहेत. या परीक्षेनंतर पाचव्या सत्राचा निकाल लागेल आणि त्यात काही विद्यार्थ्यांना जर एटीकेटी लागली तर विद्यार्थ्यांना पुन्हा पाचव्या सत्राची परीक्षा द्यावी लागणार असल्याची बाब युवासेनेने शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

परीक्षा आजपासून, अफवांना बळी पडू नका
तृतीय वर्ष बीए सत्र 6 ची परीक्षा पुढे ढकलण्याचा चुकीचा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे, मात्र ही परीक्षा नियोजित तारखेनुसार आजपासून (12 एप्रिल) सुरू होणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात आले आहेत. तरी परीक्षा पुढे ढकलण्याचा अफवांना बळी न पडता परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा विभागाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -