तीन राज्यांत गेल्या 24 तासांत 918 रुग्ण, कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आरोग्य मंत्रालयाने बोलावली बैठक

तीन राज्यांत गेल्या 24 तासांत 918 रुग्ण, कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आरोग्य मंत्रालयाने बोलावली बैठक

नवी दिल्ली : देशात कोरोना प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असून गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९१८ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6,350 वर पोहोचली आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

काल (१९ मार्च) देशभरात 1,070 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून चार महिन्यांतील संसर्गाच्या प्रकरणांमध्ये हा आकडा सर्वाधिक आहे. गेल्यावर्षी 6 नोव्हेंबर 2022 रोजी देशात सर्वाधिक एक हजार कोरोना रुग्ण आढळले होते. सध्या केरळ, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटकसह या तीन राज्यांना चाचणी, उपचार आणि लसीकरणामध्ये पाच पट धोरणाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.

मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आजाराबाबत सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोरोना संसर्ग असल्याची पुष्टी होईपर्यंत प्रतिजैविक औषधांचा वापर करू नये, असे त्यात नमूद केले आहे.
सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार औषध घेण्यापूर्वी कोरोना संसर्गासह इतर स्थानिक संसर्गाची शक्यता देखील लक्षात घेण्याची गरज आहे. शारीरिक अंतर राखणे, बंद ठिकाणी मास्क वापरणे, वेळोवेळी साबणाने हात धुण्यास मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच रोगाच्या लक्षणांवर लक्ष ठेवा, शरीराचे तापमान तपासत राहा आणि ऑक्सिजनमधील चढ-उतारांवर लक्ष ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

श्वास घेण्यास त्रास असेल तर डॉक्टरांना भेटा
जर कोणाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. पाच दिवसांपेक्षा जास्त ताप आणि खोकला असला तरीही वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. धोका असलेल्या लोकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे. मध्यम किंवा गंभीर आजार वाढण्याचा धोका असल्यास, पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषध घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे औषध पहिल्या दिवशी 200 मिलीग्राम आणि नंतर 100 मिलीग्राम चार दिवस घेण्यास मंत्रालयाने सांगितले आहे.

First Published on: March 20, 2023 3:20 PM
Exit mobile version