वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मध्य प्रदेशातील भाजप नगरसेवकाची मित्रांकडूनच हत्या

वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मध्य प्रदेशातील भाजप नगरसेवकाची मित्रांकडूनच हत्या

मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपच्या एका नगरसेवकाची त्यांच्याच मित्रांनी मारहाण करून हत्या केली. मध्य प्रदेश मधील ग्वाल्हेर जिल्ह्यातील मुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. यातही सर्वात धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी हा घडलेला सर्व प्रकार शूट करून ठेवला आहे. ग्वाल्हेर मधील वॉर्ड क्रमांक तीनमधून शैलेंद्र कुशवाह हे भाजपचे नगरसेवक होते. शैलेंद्र यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी आंदोलन केले आहे. शैलेंद्र कुशवाह हे राज्यमंत्री भर सिंह कुशवाह यांचे नातेवाईक आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे निकटवर्तीय होते.

या घटनेच्या सुरुवातीच्या तपासात अशी माहिती समोर आली की, वाढदिवसाचा केक कापल्यानंतर पाच मित्रांनी दारु पिण्यास सुरुवात केली. दारु प्यायल्यानंतर दारूच्या नशेत त्यांचा शैलेंद्र कुशवाह यांच्याशी वाद झाला. त्यानंतर चौघांनी मिळून काठीने त्यांना मारहाण केली. शैलेंद्र यांना रस्त्याच्या बाजूला बेदम मारहाण करताना त्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला. त्याचबरोबर तो व्हिडिओ सोशल मीडियावर सुध्दा व्हायरल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमित सांघी यांनी या संदर्भांत सांगितले की, शैलेंद्र कुशवाह यांना विक्की राणाच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावण्यात आले होते. त्यांचे चार मित्र राजेश शर्मा, भूरा उर्फ सर्वेश तोमर, विनीत राजावत आणि धीरज पाल हे सुद्धा त्यावेळी वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित होते.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शैलेंद्र कुशवाह यांचे नातेवाईक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांना जखमी अवस्थेत शैलेंद्र यांना रुग्णालयात दाखल केले. पण अधिक प्रमाणात मारहाण झाल्यामुळे नगरसेवक शैलेंद्र यांचा उपचारावेळीच मृत्यू झाला. घडलेल्या या सर्व घटनेचा निषेध करत शैलेंद्र यांच्या कुटुंबीयांनी आंदोलन केले आहे. या घटनेतील आरोपी विक्की राणा याला अटक करण्यात आली असून कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


हे ही वाचा – सीमावादात कुणीही पक्षाचा वाद आणू नये; फडणवीसांचा शरद पवारांना टोला

First Published on: November 25, 2022 2:33 PM
Exit mobile version