लुडो खेळताना आला खोकला, मित्राने झाडली गोळी

लुडो खेळताना आला खोकला, मित्राने झाडली गोळी

दिल्लीतील नोएडा शहरात लुडो खेळताना एकाला खोकला आला म्हणून त्याच्यासोबत खेळत असलेल्या मित्राने त्याच्यावर गोळी झाडली. ही गोळी कोरोनाच्या संशयाने झाडली असं बोललं जात आहे. यामध्ये एक जण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. देशात सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अनेकजण वेगवेगळे खेळ खेळत आपला वेळ घालवत आहेत. मात्र, हे खेळ अशा पद्धतीने जीवघेणे ठरतील याचा कोणी विचार देखील केला नसेल.

देशावर कोरोना विषाणूचं संकट असताना वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. दिल्लीतील गौतम बुद्धनगर जिल्ह्यात अशीच एक विचित्र घटना घडली. ग्रेटर नोएडा परिसरातील दयानगर गावातील सेंथली मंदिराच्या ठिकाणी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास चार जण लुडो हा खेळ खेळत होते. जय, वीर ऊर्फ गुल्लू, प्रवेश आणि प्रशांत असे चार जण हा खेळ खेळत होते. दरम्यान, खेळताना प्रशांतला खोकला आला. त्यानंतर एकाने प्रशांत खोकल्याच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार करत असल्याचं म्हटलं. त्यावरून चौघांमध्ये मध्ये मोठा वाद झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि अखेर वीर ऊर्फ गुल्लू याने त्याच्याजवळील बंदूक बाहेर काढली.


हेही वाचा – कोरोना विषाणूचे आहेत तीन प्रकार; जाणून घ्या कोणता आहे सर्वात घातक


वीर ऊर्फ गुल्लूने बंदुकीचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद न मिटल्याने वीरने प्रशांतच्या मांडीवर गोळी झाडली. यामध्ये प्रशांत हा जखमी झाला. प्रशांतला नोएडातील कैलास रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती स्थिर असून, घाबरण्याचं काही कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी जारच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

First Published on: April 16, 2020 7:37 AM
Exit mobile version