लॉकडाऊनमुळे नोकरी ,धंदा ठप्प, गावकऱ्यांनी विकली किडनी, दलालांची चांदी

आसाममध्ये आजपर्यंतच्या सगळ्यात मोठ्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. पण यात पकडण्यात आलेले १२ आरोपी हे तस्कर नसून साधे सरळ गावकरी आहेत. विशेष म्हणजे यात काही गावातील महिलांचाही समावेश आहे. लॉकडाऊनमुळे नोकरीधंदाच ठप्प झाल्याने गावकऱ्यांनी किडनी विकून कर्ज फेडले तर काहीजणांनी घरखर्चासाठी किडनी विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुवाहाटीतील मोरीगाव जिल्हातील धरमतुल गावात किडनी तस्करीचे हा धंदा सुरू होता.

गेल्या दिड वर्षांपासून संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी गेल्या वर्षाप्रमाणेच याही वर्षी काही राज्यांनी लॉकडाऊन केला. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेला सामान्य नागरिक यात पूरता भरडला गेला आहे. गुवाहाटीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिणामी कामधंदाच बंद झाल्याने गावकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. एकवेळंच अन्न मिळणंही मुश्किल असतानाच कर्जाचा डोंगरही वाढत असल्याने मोरीगाव येथील ग्रामस्थ नैराश्यात जात आहेत.

याचाच गैरफायदा अवयव तस्करांनी घेतला असून किडनी विका आणि पैसे कमवा. असे आमिष दाखवत तस्करांनी गावकऱ्यांना किडनी विकण्यास भाग पाडले. श्रीलंका,बांग्लादेशाबरोबर आखाती देशात किडनीला मागणी अधिक आहे. यामुळे तस्कर गावकऱ्यांना कोलकाता येथील एका हॉस्पीटलमध्ये घेऊन जातात. तेथे गेल्यावर गावकऱ्यांची किडनी काढली जाते. नंतर त्यांच्या हातावर ठरलेल्या रकमेच्या निम्मी रक्कम दिली जाते. किडनी तस्करी बेकायदेशीर असल्याने गावकरी पोलिसांकडे तक्रारही करू शकले नाहीत. याचाच गैरफायदा घेत तस्करांनी पैसे कमावल्याचे समोर आले आहे. एका गावकऱ्याला किडनीच्या मोबदल्यात पाच लाख रुपये देण्याचे सांगण्यात आले. पण किडनी काढल्यानंतर त्याच्या हातात एक लाख रुपये ठेवत त्याची बोळवण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली. गावातील एका संस्थेला जेव्हा याबद्दल कळाले त्यानंतर हे किडनी रॅकेट समोर आले.

First Published on: July 15, 2021 3:05 PM
Exit mobile version