Shraddha Murder Case : जामिनासाठी आफताबने दाखल केली याचिका

Shraddha Murder Case : जामिनासाठी आफताबने दाखल केली याचिका

नवी दिल्ली – श्रद्धा हत्याप्रकरणात अफताब पुनावाला याने जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अफताब सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

अफताब पुनावाला याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या श्रद्धाची अफताबने मे महिन्यात हत्या केली होती. मात्र, या हत्येच्या सहा महिन्यांनंतर याचा खुलासा झाला. हत्येनंतर अफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. हे तुकडे त्याने जवळच्याच महरौली जंगलात फेकले. श्रद्धाचा कोणाशीच संपर्क होत नसल्याने तिच्या मुंबईतील मित्रांनी तिची चौकशी सुरू केली. तेव्हा तिची हत्या झाल्याचं लक्षात आलं. तेव्हापासून हे प्रकरण उजेडात आलं. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.

महरौली जंगलातून सापडलेल्या हाडांची डीएनए तपासणी करण्यात आली होती. ही हाडं तिचीच असल्याचं डीएनए तपासणीतून समोर आलं आहे. श्रद्धाचा वडिलांचा डीएन सापडलेल्या हाडांशी जुळला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांना महरौली आणि गुरुग्रामच्या जंगलात सापडलेली हाडं ही श्रद्धाचीच असल्याचे सिद्ध झाले आहे. या जंगलातून गोळा केलेल्या सर्व हाडांचे सॅपल्स सीएफएसएलला पाठवण्यात आले होते. आरोपी आफताबच्या कबुलीनंतर ही हाडं जप्त करण्यात आली होती. आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीचा रिपोर्टही दिल्ली पोलिसांना मिळाला आहे.

या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत असतानाच अफताबने आता जामिनासाठी अर्ज केला आहे. उद्या या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र, त्याला जामीन मिळू नये अशी संबंध देशवासीयांची मागणी आहे. तो जामिनावर सुटून बाहेर आला तर या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

श्रद्धाच्या वडिलांचे आरोप

वसईच्या तुळींज आणि मणिपूर पोलिसांनी असहकार्य केले. तसे झाले नसते तर श्रद्धाचा जीव वाचला असता, असा आरोप श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. विकास वालकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्या शुक्रवारी भेट घेतली. या भेटीनंतर विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्यासुद्धा उपस्थित होते.

First Published on: December 16, 2022 3:01 PM
Exit mobile version