गुंतवणूकदारांना पाहिजे न्याय; अदानी समूहाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

गुंतवणूकदारांना पाहिजे न्याय; अदानी समूहाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) अहवालामुळे अदानी ग्रुप मोठा फटका बसला आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहातील सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण सुरू असतानाच सुमारे २० हजार रुपये मूल्याचा एफपीओ मागे घेण्याची वेळ अदानी समूहावर ओढवली आहे. अशातच आता अदानी समुहाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. (Adani Group case in Supreme Court Possibility of a new dispute)

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च अहवालानंतर आर्थिक तोटा सहन करणाऱ्या अदानी समुहाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. एका याचिकाकर्त्याने गुंतवणूकदारांच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, बुधवारी अदानी इंटरप्रायझेस लि. चा एफपीओ मागे घेतल्यानंतर गुरुवारी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी व्हिडीओ मेसेजद्वारे गुंतवणूकदारांशी संवाद साधला. माझ्यासाठी गुंतवणूकदारांचे हित सर्वतोपरी आहे. बाकी सर्व दुय्यम आहे. गुंतवणूकदारांना संभाव्य नुकसानीपासून वाचवण्यासाठीच आम्ही एफपीओ मागे घेतला, असे स्पष्टीकरण गौतम अदानी यांनी दिले. या निर्णयाचा आमचे विद्यमान ऑपरेशन्स आणि भविष्याच्या योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही अदानी यांनी सांगितले.

त्याशिवाय, काही दिवसांपूर्वीच ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी तिसऱ्या क्रमांकावरून 11व्या क्रमांकावर आले होते. पण आता ते टॉप 20च्या यादीत देखील नाहीत. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील हेराफेरी आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने हे आरोप बोगस आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. यावरून देशात विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी केंद्र सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.


हेही वाचा – अदानी ग्रुपवर आर्थिक संकट, मग आता धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचं काय? वाचा सविस्तर

First Published on: February 3, 2023 1:23 PM
Exit mobile version