दिल्लीत आदित्य ठाकरेंनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट, भेटीचे कारण काय?

दिल्लीत आदित्य ठाकरेंनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट, भेटीचे कारण काय?

राज्य पातळीवरच नाही तर देश पातळीवर आता सत्ताधारी भाजप पक्षाच्या विरोधात विरोधकांनी मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. शक्य ते प्रयत्न करून विरोधक एकत्र येत आहेत. भाजपपासून संविधानाला धोका निर्माण झाला आहे, असे कारण पुढे करत विरोधक भाजपविरोधात रणनिती आखत आहेत. दोन दिवसांपूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता लगेच आदित्य ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजपरीवाल यांची भेट घेतल्याने याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Aditya Thackeray met Arvind Kejriwal in Delhi) या भेटीबाबतची माहिती स्वतः आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून दिली.

हेही वाचा – राज ठाकरेंच्या तडकाफडकी निर्णयाने बदलापूर, उल्हासनगरमधील कार्यकर्त्यांना धक्का

ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्या साखरपुड्यासाठी दिल्ली येथे गेले होते. त्यानंतर त्यांनी आज (ता. 14 मे) सकाळी केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर “आज सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आमच्यासोबत खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि संजय सिंह उपस्थित होते. लोकशाही आणि आपली राज्यघटना धोक्यात आहे. आणि जमेल त्या मार्गाने आपण त्यांचं संरक्षण केलं पाहिजे”, असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

या वर्षी ठाकरे कुटुंबिय आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये ही दुसऱ्यांदा भेट घडली आहे. याआधी 24 फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल हे मुंबईच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली होती. ती भेट मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर घेतली गेली असल्याचे सांगण्यात येत होते. मुंबईमध्ये आप मनपा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी करत आहे.

दरम्यान, येत्या काही महिन्यात विरोधकांच्या भेटीगाठी वाढल्याच्या पाहायला मिळत आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक एकत्र येत असून संविधानाच्या बचावासाठी हे सगळं काही करण्यात येत असल्याचे विरोधकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

First Published on: May 14, 2023 5:06 PM
Exit mobile version