राज ठाकरेंच्या तडकाफडकी निर्णयाने बदलापूर, उल्हासनगरमधील कार्यकर्त्यांना धक्का

सध्या राज ठाकरे हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज अंबरनाथ येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याशिवाय त्यांनी बदलापूर आणि उल्हासनगरमधील कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशीही संवाद साधला.

MNS Activist in Badlapur, Ulhasnagar shocked by Raj Thackeray's hasty decision

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना लोकांची प्रचंड गर्दी होते. लोकांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देखील मिळतो, मात्र त्या पाठिंब्याचे मतात रूपांतर होताना पाहायला मिळाले नाही. त्यामुळे आता निवडणुका जाहीर होण्याआधीच यामागची कारणे शोधण्यासाठी राज ठाकरे यांनी अनेक जिल्ह्यात दौरे करण्यास सुरूवात केली आहे. सध्या राज ठाकरे हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज अंबरनाथ येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याशिवाय त्यांनी बदलापूर आणि उल्हासनगरमधील कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशीही संवाद साधला. पण यानंतर राज ठाकरे यांच्या समोर आलेल्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी बदलापूर आणि उल्हासनगरमधील कार्यकारिणी बरखास्त सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना धक्का दिला आहे. (MNS Activist in Badlapur, Ulhasnagar shocked by Raj Thackeray’s hasty decision)

हेही वाचा – ‘भारत जोडो’ दाबण्याचा प्रयत्न, पण ‘यात्रे’चा परिणाम निवडणुकांमध्ये दिसतोय – राज ठाकरे

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या दौऱ्यावर असताना आज बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरे हे दोन दिवसाच्या ठाणे दौऱ्यावर असल्याने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पण या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समोर पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी सांगण्यास सुरूवात केली. ज्यानंतर राज ठाकरे यांनी पक्षातील अंतर्गत वाद पाहता पक्षात आणखी असंतोष निर्माण होऊ नये, याकरिता बदलापूर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अगदी सारखी परिस्थिती ही उल्हासनगर कार्यकारिणीची असल्याने ती देखील कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

बदलापूरनंतर उल्हासनगर मनसेची कार्यकारिणी सुद्धा राज ठाकरेंकडून बरखास्त करण्यात आली आहे. आपापसातील हेवेदावे, गटबाजी यामुळे कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. उल्हासनगरच्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरेंकडून ही घोषणा करण्यात आली. तसेच यापुढे पक्षात कोणतीही गटबाजी खपवून घेणार नाही, असेही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बजावले आहे. पक्षाचे निष्ठेने काम करा. तुमच्या कामाची कदर होणारच. जनतेचे प्रश्न समजून घ्या, ते सोडवा. आपआपसातील हेवेदाव्यात अडकून बसू नका, असे यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना बजावून सांगितले आहे.

तर पुढील 10 दिवसांत नवीन कार्यकारिणी नेमण्याचे आदेश राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत. आमदार राजू पाटील आणि ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे नव्या कार्यकारिणीत कोणाचा समावेश करण्यात येणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. तर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या या तडफडकी निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच काही लोकांची पक्षात मक्तेदारी झाली होती. आता नवे लोक आल्यावर पक्षाला बळ मिळेल, असे मत महाराष्ट्र सैनिकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.