खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटर बायो बदलत लिहिलं..

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटर बायो बदलत लिहिलं..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून वादग्रस्त आणि बदनामीकारक वक्तव्ये करणे हे राहुल गांधी यांना चांगलेच महागात पडले आहे. कारण यामुळे राहुल गांधी यांचे खासदारकी पद रद्द करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालय कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ज्यानंतर आता राहुल गांधी यांनी सुद्धा त्यांच्या ट्विटर अकाउंटवरील त्यांच्याबाबतच्या माहितीमध्ये बदल केल्याचे दिसून येत आहे.

राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरील माहिती बदलत “अपात्र खासदार” असे लिहिले आहे. तर खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांनी “मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं। मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।” असे ट्विट करत आपले मत व्यक्त केले होते. पण राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सध्या तरी राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायाला मिळत आहे.

राहुल गांधी यांचे खासदारकी पद रद्द करण्यात आल्याने आज देशभरात सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. तर राज्यात सुद्धा छत्रपती संभाजी नगर, नागपूर आणि मुंबई येथे काँग्रेसकडून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच दिल्लीतील राजघाट येथे काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी सुद्धा सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली आहे.

कोणत्या प्रकरणामुळे राहुल गांधी यांची खासदारकी झाली रद्द?
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी हे कर्नाटकातील कोलारमध्ये म्हणाले होते की, “सर्व चोरांची आडनावे मोदी कशी आहेत?” राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर सुरत पश्चिमेतील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी समाजाचा अपमान केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण सुरतच्या न्यायालयात पोहोचले. या प्रकरणात राहुल गांधी यांना याआधी 9 जुलै 2020 रोजी सुरत न्यायालयात हजर राहावे लागले होते. तर गेल्या महिन्यात पूर्णेश मोदी यांनी या प्रकरणी लवकर निर्णय घेण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 8 अन्वये ही कारवाई करण्यात आलेली आहे. मोदी आडनावावरून राहुल गांधी यांनी बदनमीकारक वक्तव्य केले होते. याच प्रकरणी काल गुरुवारी (ता. 23 मार्च) सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी त्यांचा 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देखील मंजुर करण्यात आला. पण कोर्टाने ही शिक्षा सुनावल्यानंतरच त्यांची खासदारकी धोक्यात आली होती. तसेच खासदारकी अपात्रता या निर्णयानंतरच लागू करण्यात आलेली होती. यानुसार आज शुक्रवारी (ता. 24 मार्च) त्यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याची अधिकृत घोषणा लोकसभा सचिवालयाकडून करण्यात आली आहे.


हेही वाचा – ठाकरे गटाला पुन्हा नाशकात धक्का; शिवसेना महिला आघाडी शिंदे गटाच्या वाटेवर

First Published on: March 26, 2023 11:45 AM
Exit mobile version