न्यायालयाकडून जामीन मिळताच इम्रान खानचा पाकिस्तानी सैन्यावर निशाणा, म्हणाले..

न्यायालयाकडून जामीन मिळताच इम्रान खानचा पाकिस्तानी सैन्यावर निशाणा, म्हणाले..

पाकिस्तानात मागच्या काही दिवसांत झालेल्या हिंसाचारामागे सरकारचा हात असल्याचा आरोप पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी केला आहे.

पाकिस्तानातील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना काही दिवसांपूर्वी इस्लामाबाद न्यायालयाच्या बाहेरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी न्यायालयाने इम्रान खान यांना दोन आठवड्यांचा जामीन देत दिलासा दिला आहे. पण यानंतर आता इम्रान खान हे लष्करावर जोरदार टीका करत आहेत. इम्रान खान यांनी आता लष्कराला खुले आव्हान दिले असून राजकारण करायचे असेल तर त्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष काढावा, असे म्हटले आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगचे डीजी मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांचे नाव घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. (After getting bail from the court, Imran Khan targeted the Pakistani army)

इम्रान खानने लष्करावर ओढले ताशेरे
जामीन मंजुर झाल्यानंतर इम्रान खान यांनी शनिवारी लाहोर येथील त्यांच्या निवासस्थानी जाहीर सभा घेतली. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगचे प्रमुख मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी त्यांच्या एका वक्तव्यात इम्रान खान यांना ‘ढोंगी’ म्हटले होते. याबाबत बोलताना इम्रान खान म्हणाले की, ‘ऐका मिस्टर डीजी आयएसपीआर…. तुमचा जेव्हा जन्मही झाला नव्हता, तेव्हा मी जगात देशाचे प्रतिनिधित्व करत होतो आणि देशाचे नाव गौरवित होतो. मला ढोंगी म्हणताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे.’

सैन्य राजकीय पक्ष का तयार करत नाही?
इम्रान खान यावेळी म्हणाले की, “तुम्ही राजकारण करत असाल तर तुम्ही तुमचा राजकीय पक्ष का काढत नाही. माझ्यावर असे आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे बोलताना थोडी तरी लाज बाळगा. जेव्हा ते पंतप्रधान होते, तेव्हा लष्कराची प्रतिमा चांगली होती. पण जेव्हा तत्कालीन लष्करप्रमुखांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला आणि पाकिस्तानातील सर्वात भ्रष्ट लोकांना सत्तेवर आणले तेव्हा लोकांनी लष्करावर टीका करण्यास सुरुवात केली. माझ्यामुळे नाही तर माजी लष्करप्रमुखांमुळे लष्करावर टीका होत आहे, असे सांगत इम्रान खान यांनी लष्करावर ताशेरे ओढले.

हेही वाचा – नौदल आणि NCBची अरबी समुद्रात मोठी कारवाई, ‘इतके’ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले

यापूर्वीही इम्रान खान यांच्या अटकेवरून पाकिस्तानात मोठा हिंसाचार झाला होता. याबाबत बोलताना इम्रान खान म्हणाले की, या हल्ल्यात अज्ञात लोकांचा सहभाग होता. पण त्यावेळी सरकारने पीटीआय नेते आणि पक्षाच्या 3500 हून अधिक कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले. सत्ताधारी पक्षांना असे वाटते की आम्ही निवडणूक लढवू नये, त्यामुळे आमच्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) प्रमाणेच त्यांच्यावर आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांवर छापे टाकून अटक केली जात आहे. न्यायव्यवस्था हा देशातील आशेचा शेवटचा किरण असल्याचेही इम्रान खान यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. सरकार माध्यमांवर नियंत्रण ठेवत असून सोशल मीडियावरही बंदी आणली जात असल्याचे इम्रान खान यांच्याकडून सांगण्यात आले.

First Published on: May 14, 2023 3:29 PM
Exit mobile version