श्रीलंकेत आक्रमक आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघेंचे खासगी घर जाळले

श्रीलंकेत आक्रमक आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघेंचे खासगी घर जाळले

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघेंनी राजीनामा दिल्यानंतरही आंदोलकांचा राग शांत झालेला नाही. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावरून थेट विक्रमसिंघे यांचे घर  गाठत त्यांचे घर जाळले. सकाळीच राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर लाखो आंदोलकांनी कब्जा केला होता. तिथे तोडफोड, स्विमिंग पुलमध्ये मौजमजा, मद्य प्राशन केल्यावर हे आंदोलक रात्रीच्या सुमारास अधिक हिंसक झाले.

 विक्रमसिंघे यांच्या निवासस्थानातून धूर आणि आगीचे लोळ उठताना दिसत आहेत. पंतप्रधान निवासस्थानाबाहेर हजारोंच्या संख्येने आंदोलक जमल्याचे दिसत आहे. श्रीलंकन लष्कराने विक्रमसिंघे यांना अज्ञात स्थळी लपविले आहे. जाळते घर विक्रमसिंघे यांची खासगी मालमत्ता आहे.

गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेमध्ये आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेली असून देश मोठ्या संकटाला तोंड देत आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. देशावर कर्जाचा भलामोठा डोंगर उभा राहिला असून देशात अन्नधान्याचा मोठा तुडवडा निर्माण झाला  आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या गोताबाया सरकारविरोधात जनक्षोभाचा भडका उडाला असून याला आता हिंसक वळण लागले आहे.

रानिल विक्रमसिंघे यांनी मे महिन्यामध्ये पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतली होती. त्यांनी आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केले आहे.

First Published on: July 10, 2022 12:14 AM
Exit mobile version