अतिसूक्ष्म धूलिकण अन् कोरोना विषाणूने ‘या’ शहरांचा धोका वाढला – संशोधन

अतिसूक्ष्म धूलिकण अन् कोरोना विषाणूने ‘या’ शहरांचा धोका वाढला – संशोधन

प्रातिनिधीक फोटो

मुंबई आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये प्रदूषण जास्त असल्यानेच या दोन्ही शहरांमध्ये कोरोनाबाधित आणि कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. मुख्यत्वेकरून वाहतूक आणि औद्योगिक प्रदूषण ही दोन कारणे समोर आल्याचे या संशोधनाच्या माध्यमातून नोंदविण्यात आले आहे. अतिसूक्ष्म धूलिकणांच्या (पीएम २.५) उत्सर्जनाने) प्रदूषण असलेल्या भागातील रहिवाशांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका हा सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष या अभ्यासाच्या माध्यमातून नोंदविण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये मुंबई आणि पुणे या शहरातील प्रदुषणाचा संबंध हा कोरोनाच्या संसर्गासोबत असल्याचे समोर आले आहे.

काय आहे संशोधन ?

कोरोनाचा संसर्ग तसेच मृत्यू याचा थेट संबंध हा वायू प्रदूषणाशी असल्याचा दावा संशोधनामध्ये करण्यात आला आहे. मुंबई, पुणे तसेच देशातील एकुण १६ शहरांमध्ये हे संशोधन करण्यात आले. संशोधनाच्या निमित्ताने या १६ शहरांमधील मार्च २०२०२ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीतील कोरोनाबाधितांचे प्रमाण तसेच राष्ट्रीय पीएम २.५ उत्सर्जनाचे २०१९ मधील प्रमाण गृहीत धरण्यात आले होते. मानवनिर्मित प्रदूषणाचे स्त्रोत आणि हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी यांच्या आधारे अतिसूक्ष्म धूलिकणग्रस्त (पीएम२य५) प्रदेश आणि कोव्हिड -१९ यांचा संबंध असे संशोधन अहवालाचा विषय आहे.

भुवनेश्वरच्या उत्कल विद्यापीठातील संशोधक डॉ सरोजकुमार साहू आणि पूनम मंगराज, आयआयटीएम पुणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ गुफरान बेग, शास्त्रज्ञ सुवर्णा टिकले, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राऊरकेलाचे भीष्म त्यागी, आयआयटी भुवनेश्वरचे व्ही विनोज यांनी या संशोधनात सहभाग घेतला.

काय आहेत प्रदूषणाची कारणे ?

पेट्रोल, डिझेल, कोळशावर आधारित वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रातील ज्वलन जास्त असलेल्या भागात कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याचे आढळले आहे. ज्या कालावधीत संशोधन झाले आहे, त्या कालावधीत १७.१९ लाख इतके कोरोनाबाधित रूग्ण हे महाराष्ट्रात होते. अतिसूक्ष्म धूलिकणांच्या उत्सर्जनात देशात महाराष्ट्र या कालावधीत दुसऱ्या क्रमांकावर होता. हवेच्या प्रदुषणामध्ये हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत मुंबई आणि पुणे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांवर आहेत. पीएम २.५ ची घनता अधिक असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरातसारख्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे आढळले. मुंबई, पुणे, अहमदाबाद यासारख्या महानगरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आढळली. या शहरांमध्ये पीएम २.५ उत्सर्जनाचे प्रमाण अधिक आढळले आहे.

कोरोनाच्या विषाणूचा प्रसार हा हवेतून अधिक होतो. वाढते प्रदूषण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत आहे. त्यामुळेच याबाबत आणखी संशोधन होण्याची गरज असल्याचे मत डॉ सरोजकुमार साहू या संशोधकाने व्यक्त केले आहे. कोरोना विषाणू धूलिकणांना चिकटतो याबाबतचे पुरावे आहेत. त्यामुळेच त्याचा हवेतून प्रसार हा वेगवान पद्धतीने होतो. पण यावर संशोधनाची गरज असल्याचेही मत मांडण्यात आले आहे. तर दररोज वायू प्रदूषणाचा सामना करणाऱ्या व्यक्तीचे फुफ्फुस कमजोर होऊ शकते असे मत आयआयटीएम सफरचे संचालक डॉ गुफरान बेग यांनी मांडले आहे. अतिसूक्ष्म धूलिकणांचे उत्सर्जन आणि कोरोना विषाणू एकत्र येतात तेव्हा फुफ्फुसांचे नुकसान तीव्र गतीने होऊन प्रकृती अधिक खालावते असेही मत त्यांनी मांडले आहे.


 

First Published on: June 26, 2021 1:35 PM
Exit mobile version