अफगाणिस्तानचा दहशतवादासाठी वापर करण्यात येऊ नये; अजित डोवालांची पाकिस्तानवर टीका

अफगाणिस्तानचा दहशतवादासाठी वापर करण्यात येऊ नये; अजित डोवालांची पाकिस्तानवर टीका

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मॉस्को येथे पार पडलेल्या अफगाणिस्तानच्या सुरक्षा संवादात भाग घेतला होता. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानच्या सुरक्षेबाबत आपले मत व्यक्त केले. या संवादामध्ये अजित डोवाल यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांना इशारा दिला आहे. कोणत्याही देशाला अफगाणिस्तानचा आतंकवादाचा वापर करण्यात देण्यात येऊ नये, असे स्पष्ट मत यावेळी डोवाल यांनी व्यक्त केले. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, अफगाणिस्तानला जेव्हा कधी भारताची गरज लागेल, तेव्हा भारत अफगाणिस्तानची साथ सोडणार नाही. याचवेळी बदलत्या प्रादेशिक सुरक्षा मापदंडावरही चर्चा करण्यात आली.

मॉस्को येथे झालेल्या अफगाणिस्तानवरील पाचव्या प्रादेशिक संवादात, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले की, “कोणत्याही देशाला दहशतवाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्यासाठी अफगाणिस्तानची भूमी वापरण्याची परवानगी दिली जाऊ नये. तसेच अफगाणिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांचा अफगाणिस्तानच्या विकासासाठी प्रथम वापर करण्यात आला पाहिजे.”

पुढे अजित डोवाल म्हणाले की, अफगाणिस्तान सध्या कठीण टप्प्यातून जात असून भारताचे अफगाणिस्तानशी ऐतिहासिक आणि विशेष संबंध आहेत. ते म्हणाले की, अफगाणिस्तानातील लोकांचे कल्याण आणि मानवतावादी गरजा भागवणे याला भारताकडून सर्वोच्च प्राधान्य आहे आणि नवी दिल्लीमध्ये बसलेले भारताचे सरकार अफगाणिस्तानच्या लोकांना त्यांच्या गरजेच्या वेळी कधीही एकटे सोडणार नाही.

अफगाणिस्तान देशाच्या भागात दहशतवाद हा मोठा धोका बनला आहे. इस्लामिक स्टेट आणि लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांशी सामना करण्यासाठी संबंधित देश आणि त्यांच्या एजन्सींमध्ये गुप्तचर आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याची गरज आहे, असेही अजित डोवाल यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा – आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

अजित डोवाल यांनी बुधवारी (ता. 8 फेब्रुवारी) रशियाच्या दोन दिवसीय दौऱ्याला सुरुवात केली. यादरम्यान, यजमान देश आणि भारताव्यतिरिक्त, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, चीन, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानमधील उच्च सुरक्षा अधिकारी अफगाणिस्तानवरील सुरक्षा परिषदेच्या सचिवांच्या पाचव्या बहुपक्षीय बैठकीत सहभागी झाले होते. अफगाणिस्तानातील सुरक्षा परिस्थिती आणि त्यासमोरील मानवतावादी आव्हानांसह विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

First Published on: February 9, 2023 8:11 AM
Exit mobile version